सायखेडा : निफाड तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्य रूपाने शिक्षकांनी दिलेले योगदान हे कोरोना रुग्णांना दिलासा आणि प्रशासनाला सहकार्य करणारे आहे. त्यांचे योगदान तालुक्यातील जनता कधीच विसरणार नाही, इतर कर्मचाऱ्यांनी शिक्षकांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. ते निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मदतनिधी उभारून उपलब्ध केलेल्या साहित्याच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सुलभा पवार, पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, बंडू आहेर, सामाजिक कार्यकर्ते शंकर संगमनेरे तसेच प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पाठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, तालुका वैद्यकीय अधिकारी राठोड उपस्थित होते.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य विभागाची सुरू असलेली कसरत पाहून निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जवळपास चार लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी जमवून आरोग्याच्या दृष्टीने ४० सेमी फॉवलेर बेड, २५० फेसशिल्ड, १० नेब्यूलायझर सेट, ३० व्हेपोरायझर सेट आदी साहित्य आरोग्य विभागाला वाटप उपलब्ध करून दिले. कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अपुरी बेड संख्या आणि हतबल झालेली आरोग्य यंत्रणा यामुळे आपण आपले समाजाप्रति असलेले कर्तव्य करावे, असे भावनिक विचार करून तालुक्यातील शिक्षक बांधवांनी सामुदायिक निधी जमा केला. निधी जमा करताना कोणालाही सक्ती करण्यात आली नाही. जमा झालेल्या निधीतून तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी चार बेड, कोरोनाकाळात सर्वेक्षण आणि इतर कामे करणाऱ्या आशा सेविका यांना फेसशिल्ड, नेब्यूलायझर सेट, व्हॅप्युरायझर सेट यांचे वाटप करण्यात आले. शिक्षकांच्या वतीने कोरोनायोद्धा म्हणून प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
---------------------------------
निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मदतनिधीतून दिलेल्या साहित्य लोकार्पणप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रांत डॉ. अर्चना पठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड, शिवा पाटील सुरासे, शंकर संगमनेर, केशव तुंगार आदी. (२१ सायखेडा )
===Photopath===
210521\21nsk_10_21052021_13.jpg
===Caption===
२१ सायखेडा