नाशिक : मागील काही वर्षात राज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आहे; पण पुन्हा एकदा सहकार उभा राहण्यासाठी राज्यकर्ते प्रयत्न करत आहेत. बंद पडलेला रानवड साखर कारखाना सुरू झाला तसाच निफाड व नाशिक साखर कारखानाही सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी संबंधित घटकांनी चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री,खासदार शरद पवार यांनी रानवड सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी केले.
गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या रासाकाचे बॉयलर अग्नी प्रदीपन शरद पवार यांच्या हस्ते झाले. स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने सदर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. यावेळी पवार यांनी सांगितले, कामगारांच्या कष्टाला तोलूमोलू नका, त्यांच्यातील संघर्ष हा वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्र राज्यातील सगळ्या साखर कारखान्यांचे नेतृत्व करणारे कर्मवीर काकासाहेब वाघ हे एक थोर नेतृत्व होते. त्यांच्या नावाने सुरु असलेला साखर कारखाना बंद पडतो, शेतकरी अडचणीत येतो, मजूर रस्त्यावर येतात हे दुर्भाग्य आहे. पण, हाच कारखाना सुरु व्हावा, त्यांना हवे असणारे सहकार पुन्हा उभे रहावे, त्यांनी सुरु केलेली साखर पुन्हा सुरु व्हावी ती गोड व्हावी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. रासाकाप्रमाणेच निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना देखील सुरु व्हावा यासाठी नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सहकार तत्वावर सुरु करण्यात आलेले कारखाने केंद्र सरकार बंद करण्याच्या मार्गांवर आहे. कारखाना सुरु करणाऱ्या काकासाहेब वाघ यांना तेव्हा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. तेव्हा कामातून पुरस्कार मिळायचे पण, अलीकडे पद्मश्री पुरस्कार कसे वाटतात हे आपण पाहिले असल्याचेही त्यांनी सांगत कंगनाचे नाव न घेता टोला लगावला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी हित लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सहकारी संस्थांना जी काही मदत लागेल ती पूर्णपणे देण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक आमदार दिलीप बनकर यांनी केले.