सातपूर : खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली निमाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नाशिक-पुणे मार्गातील सिन्नर पट्ट्यातील कामे आणि इतर रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची आग्रही मागणी करण्यात आली.नाशिक-पुणे मार्गातील सिन्नर पट्ट्यातील कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याची नाराजी निमा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करतानाच नाशिक-सुरत रस्ता एकेरी असून, तो चार पदरी असावा, नाशिक-मुंबई रस्ता चार पदरी असून, तो सहा पदरी करण्यात यावा, कल्याण क्र ॉसिंग व अंजूर फाटा उड्डाणपूल लवकर करण्यात यावा, मुंबईजवळ अजून एक बंदर उभारावे, कृषीवर आधारित उत्पादनाच्या निर्यातीसाठी हल्कान पोर्ट विकसित करण्यात यावे आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन गडकरींना देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर सहभागी झाले होते. तसेच सिन्नर रस्त्याच्या कामाला गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आढावा घेण्याचा आदेश रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती निमा पदाधिकाऱ्यांनी दिली.
नाशिक-पुणे रस्त्यासाठी नितीन गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2015 10:15 PM