सिन्नर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखी व पायी दिंडीचे गुरुवारी दुपारी सिन्नर तालुक्यात आगमन झाले. पळसे येथून पहाटे दिंडी निघाल्यानंतर हजारो वारकऱ्यांमुळे सिन्नर-नाशिक मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. हजारों भाविकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. पास्ते घाटातून वारकरी येताना घाट भगवेमय झाल्याचे चित्र होते. त्यानंतर सायंकाळी दिंडी लोणारवाडी येथे मुक्कामी आली. गावोगावी पालखीचे अतिशय मनोभावे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दिंडीचे सिन्नर शहरात आगमन होणार आहे. नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते पालखीचे पूजन व स्वागत करण्यात येईल. त्यानंतर गावठा भागातून पालखीची शहरातून टाळ-मृदंगांच्या निनादात मिरवणूक काढण्यात येणार आहे. ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात येते. पालखीच्या दर्शनासाठी सिन्नरकर भाविकांची गर्दी होत असते. लोंढे गल्लीत काही वेळ पालखी दर्शनासाठी थांबविण्यात येते. शहरात विविध सामाजिक मंडळे व संस्थांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चहा-बिस्किटे, नास्ता, खिचडी देण्यात येणार आहे. परिसरातील तसेच पालखी मार्गावरील गावागावांतून शेकडो वारकरी भाविक या दिंडीत सहभागी होऊन विठूरायाच्या भेटीसाठी या वैष्णवांच्या मेळ्यातून त्यांची पावले पंढरीची वाट चालू लागतात. या दिंडीचे कुंदेवाडी, दातली मार्गे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. शुक्रवारी रात्री खंबाळे येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल. (वार्ताहर)
निवृत्तिनाथ पालखीचे आगमन
By admin | Published: June 23, 2016 11:36 PM