त्र्यंबकेश्वर : हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि वरुणराजाच्या अभिषेकात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोमवारी (दि.१९) ब्रह्म मुहूर्तावर पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून पालखीने प्रस्थान केले, तेव्हा उपस्थित वारकऱ्यांनी निवृत्तीनाथांच्या जयघोष करत, परिसरातील वातावरणात भावभक्तीचे रंग भरले. पालखी दुपारी वाखरी येथे पोहोचल्यानंतर पायी दिंडीने पंढरपूरकडे रवाना झाली.
मंगळवारी (दि.२०) आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी मागील वर्षाप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून ४० वारकऱ्यांच्या साथीने पंढरपूरला मार्गस्थ झाली. तत्पूर्वी, निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात रात्रभर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून हरिनामाचा जागर सुरू होता. पहाटे चार वाजता महापूजा, काकड आरती होऊन निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व मुखवटा ठेवलेली पालखी पाच वाजता मंदिराबाहेर आणण्यात आली. तेथे अभंग-भजन झाल्यानंतर सामाजिक अंतर ठेवत पायी दिंडीने पालखी कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. यावेळी वरुणराजानेही नाथांवर अभिषेक घातला. या ठिकाणी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी निवृत्तीनाथांची सपत्निक पूजा केली. यावेळी निवृत्तीनाथ महाराज यांच्या जयघोषात ‘वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पापे जातील भंगा’ हा अभंग गात पालखी भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरासमोर आणण्यात आली. येथेही पारंपरिक पद्धतीने ‘तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी’ हा अभंग सादर झाला. डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सजवलेल्या शिवशाही बसमध्ये पालखी विराजमान झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी स्वागत करत वारकऱ्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हरिनामाच्या जयघोषात पालखी ६.४० वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष कृष्णा सोनवणे, ॲड.भाऊसाहेब गंभीरे, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पालखी प्रमुख मानकरी मोहनुमान महाराज बेलापुरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, पुजारी जयंत महाराज गोसावी आदींसह वारकरी बांधव उपस्थित होते.
इन्फो
पौर्णिमेला परतीचा प्रवास
दरवर्षी पालखी पायी दिंडीने मजल दर मजल करीत तब्बल २४ दिवसांनी आषाढीच्या आदल्या दिवशी पंढरपूरजवळील वाखरी येथे पाेहोचत असते. तेथून ती पंढरपूरकडे मार्गस्थ होते. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोराेनाच्या संसर्गामुळे पायी दिंडीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे यंदा महामंडळाने उपलब्ध करून, दिलेल्या दाेन शिवशाही बसेसच्या माध्यमातून पालखी पंढरपूरला नेण्यात आली. यावेळी ४० वारकऱ्यांना पालखीसोबत जाण्यास परवानगी मिळाली. त्यात पुजारी, दिंडी प्रतिनिधी, झेंडेकरी, विणेकरी, चोपदार, संस्थानचे पदाधिकारी यांचा समावेश होता. मंगळवारी (दि.२०) देवशयनी एकादशी अर्थात आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठूरायाची दर्शन घेऊन पालखी चार दिवस मुक्काम करणार आहे. पौर्णिमेला पालखी त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासाला लागेल.
इन्फो
गावकऱ्यांनी सजविली बस
रविवारी (१८)पासून त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस सुरू आहे. भर पावसात वारकऱ्यांच्या प्रचंड उत्साहात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी, गेल्या वेळी शिवशाही बस सजविण्यात आली नसल्याने वारकऱ्यांनी नापसंती व्यक्त केली होती. यंदा मात्र, दोन्ही बसेस फुला-माळांनी दिमाखात सजविलेल्या होत्या. त्र्यंबकेश्वर येथील अश्विनी अडसरे व त्यांच्या सहकारी महिला यांच्या राजकुमारी बहुउद्देशीय संस्थेने एक बस सजविली, तर दुसरी बस माउली प्रतिष्ठानचे सबनीस, तसेच विंग्जफ्लोराचे कैलास माळी यांनी सजविली.