-------------------------
पेठ तालुका गुणवत्ता कक्ष बैठक
पेठ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुका शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची बैठक जनता विद्यालयाच्या सभागृहात गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विद्या प्राधिकरणाचे प्रा. दरंदले यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी करावयाच्या उपाययोजना व आगामी काळात राबवावयाच्या उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गट साधन केंद्र विषयतज्ज्ञ, अपंग समावेशित शिक्षण विशेष शिक्षक, गुणवत्ता कक्ष सदस्य आदी उपस्थित होते.
--------------------
आंबे आठवडे बाजारात पथनाट्याव्दारे जनजागृती
पेठ : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याबाबत समज व गैरसमज सामान्य जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आंबे येथील आठवडे बाजारात पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली. शाहीर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी विविध लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती केली.
---------------------
मोहन कामडी यांना आदिवासी मित्र पुरस्कार प्रदान
पेठ : लायन्स क्लब ऑफ सुप्रीम नाशिक या नामांकित संस्थेमार्फत देण्यात येणारा आदिवासी मित्र पुरस्कार मोहाचापाडा ता. पेठ येथील सामाजसेवक व युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी यांना अभय शास्री गव्हर्नर पुणे यांच्या हस्ते पुरस्कार लाइन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रीम संस्थापक जे. पी. जाधव व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
-------------------------
गुरुचरित्र पारायणनिमित्त गोपूजन
पेठ : रमणनाथ महाराज बहुद्देशीय संस्था तानसा व समस्त भाविक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महादेव मंदिरात आयोजित गुरुचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त मठाधिपती प.पू. आलोकनाथ महाराज यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. याप्रसंगी पेठ शहरासह तालुक्यातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.