नाशिक : नाशिक मनपाच्या २०१४ साली मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करायला मनपाला तब्बल ७ वर्षांचा कालावधी लागला; मात्र उशिराने का होईना मनपाने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर चमक दाखवलेल्या ४९ खेळाडूंच्या खात्यांमध्ये तब्बल ६ लाख ७१ हजार रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला.
मनपाच्या महासभेत झालेल्या ठरावामुळे क्रीडा धोरणांतर्गत नाशिक शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या ४९ खेळाडुंना रु . ६,७१,००० इतक्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. ही रक्कम थेट खेळाडूंच्या बँक खात्यात वर्ग करून मनपाने खेळाडूंना एक सुखद धक्का दिला आहे. मनपा क्रीडा धोरणात शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर उच्च कामगिरी करून शहराचे नाव उंचावतात, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने तरतूद करण्याचा ठराव २०१४ साली झाला. त्यानंतर या गुणवत्ताधारक खेळाडूंची निवड करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशाने १५ नोव्हेंबर २०१९ ला निवड समितीची रचना करण्यात आली आहे. त्यात मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे या निवड समितीचे अध्यक्ष असून, उप-आयुक्त समाजकल्याण हे सदस्य सचिव तर मुख्य वित्त व लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, मनपा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य आहेत. या निवड समितीने सन २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४९ खेळाडूंची निवड करून त्यांच्या बँक खात्यात ६ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. मनपाने गुणवत्ताधारक खेळाडूंना आर्थिक मदत करून क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात केल्याबद्दल सर्व क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
इन्फो
राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय खेळाडू
या गुणवान खेळाडूंमध्ये २०१९-२० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या आकांक्षा शिंदे आणि प्रचिती चंद्रात्रे यांना अनुक्रमे १ लाख आणि ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली; मात्र २०२०-२१ मध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूचा त्यात अंतर्भाव नाही. तर २०१९ -२० या वर्षात राष्ट्रीय स्तरासाठी श्रुती राठी, ऋत्विक शिंदे, सिया कुलकर्णी, अनन्या बत्रा, वरुण वाघ या ५ जणांचा तर २०२०-२१ या वर्षासाठी अक्षता कांबळे, राेहन राऊत, ऋतु भामरे, तनिषा कोटेचा, सौमित देशपांडे, सिया ललवाणी, ऐश्वर्या मोरे, रितेश तिडके, अनुजा उगले, दुर्गा देवरे यांचा समावेश आहे.
इन्फो
खेळाडूंना प्रारंभिक स्तरावरच आर्थिक सहाय्यता मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून तिथेदेखील चमक दाखवू शकतात. त्यामुळे मनपाच्या क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान आहे.
अविनाश खैरनार, क्रीडा संघटक.