नाशिक : महासभेला कुठलीही खबर लागू न देता तब्बल ३४ कोटी रुपयांचे ४६ प्रस्ताव परस्पर इतिवृत्तात घुसविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, सत्ताधारी भाजपाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.शनिवारी (दि.१९) महापालिकेची महासभा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या कार्यालयात सेना नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी, मागील महासभेत भाजपाने केलेला जांगडगुत्ता समोर आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गटनेता विलास शिंदे व माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, मागील महासभेत मूळ विषय पत्रिकेवर २ कोटी ८५ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव होते, तर जादा विषयात ५ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव होते. मागील महासभा विषय क्रमांक २६८ वर संपलेली होती. आता शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत विषय पत्रिकेवर ३१६ क्रमांकापासून विषय समाविष्ट करण्यात आलेले आहे. मागील महासभेच्या इतिवृत्तात मात्र विषय क्रमांक २६९ ते ३१५ हे ४६ प्रस्ताव घुसविण्यात आले आहेत. सदर प्रस्ताव हे ३४ कोटी रुपये खर्चाचे आहेत. सभागृहात या प्रस्तावांची विषय पत्रिकाही वाटण्यात आलेली नाही आणि त्याची खबरही महासभेला नाही. परस्पर ४६ प्रस्ताव समाविष्ट करत इतिवृत्तात त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे महासभेत मागील इतिवृत्ताला मंजुरी देण्यास विरोध केला जाणार असून, परस्पर विषयांची घुसखोरी करत भाजपाची हीच का पारदर्शकता असा सवालही शिवसेनेकडून उपस्थित केला जाणार असल्याचे शिंदे व बडगुजर यांनी सांगितले.
महापालिका : भाजपाच्या पारदर्शकतेवर सेनेचे प्रश्नचिन्ह३४ कोटींच्या प्रस्तावांची घुसखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:19 AM