नाशिक : मेहेर कंपनीच्या अपयशानंतरही श्रीनिवास एअरलाइन्सने नाशिक-पुणे विमान सेवेची तयारी केली खरी, परंतु या सेवेसाठी प्रवासीच न मिळाल्याने विमानसेवेचा मुहूर्त हुकला. पुण्यासाठी प्रतिसादच मिळत नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. त्यापेक्षा सुरत विमानसेवेसाठी उत्सुकता असून, कंपनी मंगळवारी (दि. ११) या सेवेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.ओझरच्या विमानतळावरून नाशिक - पुणे विमानसेवा मेहेर या सी-प्लेन कंपनीने गेल्याच महिन्यात सुरू केली. सध्या मुंबई - नाशिक रस्ता चांगला आहे, परंतु त्या तुलनेत नाशिक-पुणे रस्ता खडतर असल्याने नागरिक या मार्गावरील विमानसेवेला पसंती देतील अशी कंपनीची अटकळ होती, परंतु अवघ्या आठ दिवसांत एचएएलकडे दुपारी अडीच वाजेनंतर कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याचे निमित्त झाले आणि ही सेवा स्थगित करण्यात आली. या कंपनीपाठोपाठ नाशिकच्या श्रीनिवास एअरलाइनने मुंबई - नाशिक - पुणे अशी सेवा सुरू करण्याचे जाहीर केले, परंतु त्यांनाही एचएएलच्या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्याने सध्या मुंबई - नाशिक अशीच सेवा सुरू आहे. दरम्यान, एचएएलची तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सूचनेवरून ओझर येथे बैठक घेण्यात आली. त्यातून हा प्रश्न काही प्रमाणात सुटल्याने श्रीनिवास एअरलाइनने ३ आॅगस्टपासून सकाळी ११ वाजता नाशिक - पुणे विमान सेवा सुरू करण्याची व्यवस्था केली होती. तथापि, नागरिकांकडून या विमानसेवेला प्रतिसाद न मिळाल्याचे विमानाचे उड्डाण होऊच शकले नाही. त्याचबरोबर पुण्यापेक्षा कंपनीने अगोदर जाहीर केल्यानुसार ११ आॅगस्ट रोजीच्या नाशिक-सुरत या सेवेसाठी अधिक विचारणा होत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
पुण्यासाठी विमानोड्डाण झालेच नाही!
By admin | Published: August 03, 2015 11:28 PM