नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलेले असताना नाशिकमध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजनचा साठा अत्यल्प असून व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध नसल्याने सारीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांसाठी दिवस-दिवस प्रयत्न करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने ऑक्सिजनविना जीव गमावण्याची वेळ येऊ लागल्याने कठोरातील कठोर उपाययोजनांची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने बाधित नागरिकांच्या कुटुंबीयांची प्रचंड धावाधाव होत आहे. तसेच धावाधाव करूनही ऑक्सिजन बेड उपलब्ध हाेत नसल्याचे भयावह चित्र नाशिक शहरात सध्या दिसत आहे. त्यामुळे कोरोना होणे हे जिवावरील संकट ठरू लागले आहे. या परिस्थितीमुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर मोठ्या वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इन्फो
उपलब्ध नाही ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ४,८६५ ऑक्सिजन बेड आहेत. मात्र जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णांची संख्याच ३४ हजारांवर पोहोचली आहे. त्यातील १५ टक्के रुग्णांना जरी ऑक्सिजन लागल्याने ती क्षमता संपुष्टात आली आहे. कुठेही ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांना अनेक ठिकाणी प्रयत्न करून, गयावया करूनही बेड मिळेनासे झाल्याने आपल्या आप्तांना ऑक्सिजनविना तडफडताना पाहावे लागण्याची करुण वेळ नागरिकांवर आली आहे.
इन्फो
खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा
शहरात मनपाच्या बिटको, झाकीर हुसैन रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले असल्याने तसेच मनपाच्या रुग्णालयांमध्ये सिलेंडरचा पुरेसा पुरवठा आणि नियोजन असल्याने तिथे ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये गुरुवारी ऑक्सिजन साठा संपुष्टात येण्याची वेळ आल्यानंतरही त्यांना खासगी पुरवठादाराकडून ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्ण अन्य हॉस्पिटल्समध्ये वळवण्यासाठी विचारणा करूनदेखील कुठेही बेड मिळेनासे झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. शहराला प्रतिदिन १०० केएल ऑक्सिजनची गरज असून त्यात ऑक्सिजन प्लांटद्वारे ५० केएल उपलब्ध होत आहे. मात्र, बाकी ऑक्सिजन मिळण्यास कंत्राटदारास मुरबाडच्या प्रकल्पातूनच विलंब हाेत असल्याने सिलिंडरच्या पुरवठ्यास विलंब होत असल्याने ऑक्सिजन बेड मिळणे प्रचंड मुश्कील झाले आहे. तर शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असला तरी बेड उपलब्ध नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
इन्फो
व्हेंटिलेटर झाले फुल्ल अतिगंभीर रुग्णांसाठी जीवरक्षक प्रणाली म्हणून व्हेंटिलेटरचा उपयोग केला जातो. जिल्ह्यात सर्वाधिक ८० व्हेंटिलेटर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. तर मनपा आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण मिळून ४७० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, अतिगंभीर रुग्णांची संख्याच प्रचंड प्रमाणात वाढल्याने हे व्हेंटिलेटरदेखील अपुरे पडले आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरसह बेड मिळणे हे सर्वाधिक कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट आली असून हे प्रमाण असेच राहिल्यास मृतांमध्ये दिवसागणिक अधिक वेगाने वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे.