नाशिक : कोरोना काळातील निर्बंधांमुळे तसेच आदिवासी पाड्यांसह तालुक्यांमध्येही साधनांची अनुपलब्धता किंवा कोरोनामुळे आर्थिक ओढाताण असल्याने तपासणींसाठी खर्च करता येणेच शक्य झालेले नाही. त्यामुळे सुमारे १५ ते २० टक्के महिला शासकीय रुग्णालयांमध्ये थेट प्रसूतीसाठीच दाखल होत असल्याचे दिसून आले.
सोनोग्राफी हे महिलांच्या गर्भारपणाच्या काळात वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यास अत्यंत उपयुक्त असे उपकरण आहे. त्यामुळे गर्भवती महिला आणि सोनोग्राफी हे समीकरण जरा जास्तच रूढ झालं आहे. गर्भारपणातील वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, होणाऱ्या त्रासांमध्ये तसेच बाळाची वाढ, बाळाचे अव्यंगत्व याबाबत सोनोग्राफीचा खूप आधार आहे. सोनोग्राफीमुळे महिलांच्या जननेंद्रियांच्या कितीतरी आजारांचं निदान होतं. जन्मदोष, गर्भाशयाच्या गाठी, बीजांड कोषाच्या गाठी आदी सोनोग्राफीची चाचणी पोटावरून करावी लागते. तसेच गर्भारपणातील सोनोग्राफीमुळे बाळाच्या वाढीची इत्थंभूत कल्पना डॉक्टरांना येऊ शकते. बऱ्याच वेळा त्यावर आपण उपाययोजनापण करू शकतो. गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी करणं हा इतर चाचण्यांबरोबर असणारा नेहमीचा एक भाग आहे. ज्या स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याची भीती असते किंवा होतात त्यांच्यामध्ये अगदी सोनोग्राफीमार्फतच उपचार चालू असतात. मात्र, अनेक गर्भवती महिलांनी कोरोना काळात सोनोग्राफीसह रक्ताच्या विविध चाचण्या, तपासण्याच केलेल्या नसल्याने प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांच्या प्रसूतीत अनेक अडचणी निर्माण होतात, असेही दिसून आले आहे.
इन्फो
तपासणी, चाचणी आवश्यकच
गर्भवती स्त्रीला गर्भ राहिल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत त्याची वाढ, हालचाल बघणं हे केवळ सोनोग्राफीमुळे साध्य झालं आहे. अगदी बाळाच्या ठिपक्याएवढ्या अंशापासून ते त्याची जडणघडण आणि पूर्ण वाढ आपण नोंद करू शकतो. त्याशिवाय गर्भात असणारे आजार, विकार, दोष यांचीपण बऱ्याच अंशी माहिती मिळवू शकतो. गर्भवती स्त्रियांमध्ये नऊ महिन्यांच्या काळात तीन ते चार वेळेला सोनोग्राफी करतात व गरजेप्रमाणे जास्त वेळेसपण सोनोग्राफी केली जाते. त्यामध्ये बाळाची वाढ, गर्भजलाची पातळी, बाळाचे वजन, बाळातील जन्मदोष अशा बऱ्याच बाबींकडे लक्ष देता येणे शक्य असल्याने सोनोग्राफीद्वारे गर्भवती महिलेसह बाळाची तर रक्तचाचण्यांद्वारे गर्भवती महिलेच्या शारीरिक स्थिती, रक्तप्रमाणाबाबत माहिती मिळत असल्याने त्या करणे अत्यावश्यक असते.
कोट
जिल्हा रुग्णालयात अनेक महिला या आदिवासी पाडे तसेच ग्रामीण भागातून येत असतात. कोरोना काळात अनेक गर्भवती महिलांची कुटुंबे आर्थिक विवंचनांनी त्रस्त असतात. त्यामुळे गर्भवती महिलेच्या चाचण्या किंवा तपासण्या न करताच थेट प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांचे प्रमाण सुमारे १५ ते २० टक्क्यांहून अधिक आहे.
- डॉ. गणेश गोसावी, जिल्हा रुग्णालय