कोरोनाशी मुकाबला करताना केवळ वैद्यकीय सुविधाच नव्हे तर काेरोना प्रतिबंधक असलेले लसीकरणदेखील महत्त्वाचे आहे. शासनाच्या वतीनेच लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्धची लढाई मानली जात आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र लसीकरण करण्यातच अडचणी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लस मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यातच कोविन ॲपवर नोंदणी करणे किंवा सरकारी पोर्टलवरील नोंदणीचा मेाठा फटका नागरिकांना बसत आहे.
लसीचा डाेस घेण्यासाठी नागरिकांनी ॲपवरून अपाॅइंटमेंट घेतली, परंतु नंतर लसच शिल्लक नसल्याचे कळल्यानंतर माघारी फिरावे लागले किंवा डोस अपुरे आल्याने डोसच मिळाला नाही. मात्र नागरिकांना डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले असून या चमत्कारिक पद्धतीने वेगळीच समस्या तयार झाली आहेे. समजा पहिल्या डोसच्या वेळी असा घोळ झाला तर पुन्हा डोस मिळू शकतो, मात्र त्याची दुसरा डोस म्हणून नोंद होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यानंतर पोर्टलवर तुमचे दोन्ही डोस घेतल्याची नोंद असल्याने आता पुन्हा डाेस देता येणार नाही, असे सांगून संबंधितांना परत पाठवले जाते. काहींचा तर वेगळाच गोंधळ आहे. त्यांना पहिल्या डोसच्या वेळी पेार्टलवर अचूक नोंद झाली नाही. म्हणून दुसऱ्या वेळी पहिल्या डोसचे प्रमाणपत्र आले आहे आणि आता दुसरा डोस घ्या म्हणून मेसेज येत आहेत.
इन्फो..
दुसरा डाेस घेऊनही एकाच डोसचे प्रमाणपत्र असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना आंतरराज्य किंवा हवाई प्रवासी वाहतूक करण्यासाठी अडवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांची अडचण होत आहे.
इन्फो...
नाशिक शहरातील अनेक नागरिकांनी आजूबाजूच्या ग्रामीण भागात जाऊन डोस घेतले. त्यांची नाेंद पोर्टलवर करू असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र नोंद केली गेली नाही. अशांना दुसरा डोस घेण्यासाठी अन्य केंद्रावर गेल्यावर पहिला डोस म्हणूनच दिला जाईल, असे सांगितले जात आहे.
कोट..
ॲप किंवा पोर्टलमधील नोंदीबाबत गोंधळ असला तरी नागरिकांना डोस देण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. एक डोस बाकी असेल आणि सर्टिफिकेट दुसऱ्या डोसचे आले असेल तरीही केंद्रांवर याबाबत सांगितल्यावर डोस दिला जाईल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका