नाशिक: जिल्ह्यात अद्याप लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून याबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र निर्बंधाची वेळ येऊ नये यासाठी नाशिककारांनी कोरेाना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेाना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शुक्रवारपासूनच बाजारपेठेत तसेच सोशल मीडियावर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याबाबतच्या अफवा पसरल्याने नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरदेखील जुने व्हिडीओ पोस्ट करून अफवा पसरविल्या जात असल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अद्याप लॉकडाऊन जाहीर झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी कोरेाना निर्बंध नियमांचे पालन करावे अन्यथा निर्बंध लावावे लागतील, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांनीदेखील गुरुवारच्या बैठकीत नागरिकांना गर्दी कमी करण्याचे तसेच नियम पाळण्याचे आवाहन केले होते. जिल्ह्यात अद्यापही निर्बंध लावण्यात आलेले नसले तरी नागरिकांनी बेफिकिरी दाखविली आणि रुग्ण संख्येत वाढ झालीच तर प्रसंगी निर्बंध लावावेच लागतील, असा इशारादेखील देण्यात आला आहे.