नाशिक महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली असून, निवडणुकीला सामोरे जात असताना शाखाध्यक्षांना नियुक्त करून त्यांना बळकट करण्यात येणार आहे. त्यासाठी अमित ठाकरे, तसेच मनसेचे अन्य नेते नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी राजगडावर शाखाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांशी संवाद साधला. त्याचबराेबर कोणतेही सरकार कायम नसते, असे सांगूनच त्यांनी थेट सेनेच्या सरकारवरच प्रहार केला आहे. कोणतेही सरकार कायम नसते, कोण काम करते आणि काेण नाही, हे लाेक बघतच असतात, असे सांगून अमित ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकाळातील कामांना उजाळा दिला. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई- पुणे आणि नाशिक येथे सर्वच ठिकाणी मनसे बैठका घेत आहे. मनसे आपले काम करीत आहे. मनसेने किती कामे केली आणि नंतर किती कामे मेंटेन झाली, हे नागरिक बघतच आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
पक्षाच्या दृष्टीने शाखाध्यक्षपद महत्त्वाचे असून, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर आहेत. संघटना त्यातून बळकट होईल, असेही अमित ठाकरे म्हणाले. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अमेय खोपकर उपस्थित होते.
इन्फो..
‘सर्व विरोधकांचा हिशेब चुकता होणार’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी सर्व विरोधकांचा हिशेब चुकता करणार, असे फलक लावण्यात आल्याने राज ठाकरे या निवडणुकीत नक्की कोणाचा हिशेब चुकता करणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
-----