नाशिक- करवीढीचा बोजा लादल्याने टिकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव सिद्ध करुन मुंढेंना नाशकातुन अन्यत्र पाठवून देण्याच्या इराद्याने बोलविण्यात आलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर मुंढेंसारखा अधिकारी नाशकातच रहावा यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मुंढे समर्थक नागरिकांनी शुक्रवारी(दि.३१) रॅलीद्वारे समर्थन दर्शवले.मुंढेंविरुद्ध अविश्वासाच्या ठरावाची चर्चा सर्वत्र पसरु लागताच दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर त्यांचे समर्थक व विरोधकांमध्ये सोशल वॉर पहायला मिळत होते. जनमत संग्रहसाठी नागरिकांची लेखी मतेही गोळा करण्यात आली होती. शनिवारी (दि.३१) होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी या ‘वॉक फॉर कमिशनर’ला परवानगी नाकारली होती. मात्र गुरुवारी रात्री उशिरा रॅलीला परवानगी मिळाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेच्या समस्या समजावून घेण्यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम सुरु केला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज मुंढे समर्थक नाशिककरांनी ‘वॉक फॉर कमिशनर’ हा नारा देत रॅली काढली. गोल्फ क्लब येथुन सकाळी १० वाजता रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीत ‘नो गुंडे, ओन्ली मुंढे’च्या घोषणा देत, मुंढेंना समर्थन देणारा मजकूर लिहीलेले फलक हातात घेत हजारो नाशिककर सहभागी झाले होते.महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर विविध घोषणा देत रॅलीचा समारोप झाला.
नो गुंडे, ओन्ली मुंढे ; तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नाशिककर रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:16 AM