महापालिकेने नाशिक रोड परिसरामध्ये दुर्गा उद्यान, मनपा विभागीय कार्यालय, वास्को चौक, मुक्तिधाम, के.एन. केला हायस्कूल, दसकगाव, जयभवानी रोड, यशवंत मंडई याठिकाणी हॉकर्स झोन जाहीर केले आहेत. मात्र, नाशिक रोड भागातील महत्त्वाचे रस्ते, चौक व फुटपाथवर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. जुन्या बिटको रुग्णालयाचा शाहूपथ, मुक्तिधामसमोरील जामा मशीद रोड, अण्णा हजारे मार्ग, जुनी स्टेट बँक रोड, आंबेडकर रोड, शिवाजी पुतळा चौक, जेल रोड, जुना सायखेडा रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजी, फळविक्रेते व इतर विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा व फूटपाथवर दुकाने थाटून व हातगाड्या लावून आपला व्यवसाय थाटला आहे. शिवाजी पुतळा चौक येथे भरचौकात विक्रेते बसत असल्याने अपघात घडू शकतो. हातगाडीवरील विक्रेत्यांनी हॉकर्स झोनमध्ये फिरून व्यवसाय करावा, असे सांगण्यात येते. शाहू पथ, सोमाणी उद्यान, महात्मा गांधी रोड, आंबेडकर रोड, जेल रोड या ठिकाणचे फूटपाथ हे काही विक्रेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. पादचाऱ्यांना या फूटपाथचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही.
-------
सातपूरला झोन कागदावरच
तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने सातपूर विभागात ठिकठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करून विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागेवर व्यवसाय करण्यास सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हे विक्रेते आहेत तेथेच व्यवसाय करीत आहेत, तर हॉकर्स झोनची जागा टपऱ्यांनी व्यापली आहे. सातपूर परिसरातील १,२५० विक्रेत्यांची महानगरपालिकेत नोंदणी करण्यात आली. सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील आणि मंडईबाहेरील विक्रेत्यांची जवळपास नोंदणी पूर्ण झाली आहे. सातपूर विभागात मुक्त फेरीवाला २५ ठिकाणे, टायमिंग झोन ३ ठिकाणे, ना फेरीवाला क्षेत्र २० ठिकाणे, तसेच नोंदणीकृत नेमलेले फिरते फेरीवाले, अशी ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. प्रत्यक्षात या हॉकर्स झोनच्या जागेवर भलतेच व्यवसाय सुरू झालेले आहेत. फेरीवाले विक्रेते आहे त्याच जागेवर आपला व्यवसाय करीत आहेत.
------
पंचवटीत जागेचा शोध
महापालिका प्रशासनाने पंचवटीत जवळपास १८ ठिकाणी नो हॉकर्स झोन जाहीर केले. त्यात दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, आरटीओ कॉर्नर परिसर, रामकुंड वाहनतळ, मालेगाव स्टँड उतार, होळकर पूल परिसर आदींसह इतर भागातदेखील नो हॉकर्स झोन जाहीर केले आहेत. मात्र, काही दिवसांपासून जाहीर केलेल्या नो हॉकर्स झोनच्या आसपास फेरीवाले भाजीपाला विक्रेते, तर कुठे हातगाड्या उभ्या करत अतिक्रमण केले आहे. नो हॉकर्स झोन घोषित असलेल्या दिंडोरी नाका परिसरात तर रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत, अशीच परिस्थिती रामकुंड वाहनतळ येथे आहे. दिंडोरी नाका व पेठ रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांची जागेची व्यवस्था व्हावी, यासाठी मनपाने सुरुवातीला पाण्याच्या पाटाला लागून जागा निवडली होती. मात्र, काही हॉकर्स संघटनांनी विरोध केला, तर झोपडपट्टीधारकांनी निवडलेल्या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात केली. पंचवटी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या इरिगेशनच्या जागेबाबत प्रशासनाने मागणी केली आहे. सदर जागा ताब्यात मिळाल्यास त्याठिकाणी भाजीपाला विक्रेते हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा विचार आहे.
---------------------
सिडको हॉकर्स झोन
सिडको : विभागाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्य रस्त्यावर होणारी भाजी बाजार व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी हॉकर्स झोनची निर्मिती केली; परंतु आजमितीला महापालिकेने ज्या भागात हॉकर्स झोन उपलब्ध करून दिले आहेत, त्या भागाबरोबरच अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगत सर्रासपणे अतिक्रमण करून भाजीविक्रेते व फळविक्रेते आपला व्यवसाय करताना दिसत आहेत. महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने शिवाजी चौक, पवननगर, त्रिमूर्ती चौक, उपेंद्रनगर, पाथर्डी फाटा, दत्तचौक, अंबड गाव आदी भागांचा समावेश करण्यात आला आहे; परंतु आज मनपाने नेमून दिलेल्या हॉकर्स झोनव्यतिरिक्त असलेल्या म्हणजेच मुख्य रस्त्यालगत अनेक भाजीविक्रेते, तसेच फळविक्रेते व्यवसाय करताना दिसत आहेत. महापालिकेच्या वतीने नो हॉकर्स झोनमध्ये असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते. अतिक्रमण विभागाने पाठ फिरवताच पुन्हा व्यावसायिक अतिक्रमण करून आपला व्यवसाय करीत आहेत. इंदिरानगरला दुतर्फा अतिक्रमण
इंदिरानगर भागातील कलानगर चौक ते बापू बंगला, वडाळा- पाथर्डी रस्त्यादरम्यान नो हॉकर्स झोन जाहीर करण्यात येऊनही रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून विक्रेते बसत असल्याने वाहतुकीला अडचण होत आहे. वडाळा नाका ते पाथर्डी गाव यादरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा सायंकाळ होताच भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ व वस्तूविक्रेत्यांच्या हातगाड्या किंवा रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय करीत होते. त्यामुळे महापालिकेने कलानगर चौक ते बापू बंगला या वडाळा पाथर्डी रस्त्यावर नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे; परंतु सायंकाळ होताच या रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थ, फळविक्रेते व भाजीविक्रेते, ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नो हॉकर्स झोन फलक शोभिवंत वस्तू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
-----------------
(फोटो ३० हॉकर्स, हॉकर्स १) ---------------