नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. असे असले तरी अद्यापही संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव निश्चित झालेले नाही. संमेलनाच्या तिन्ही दिवसांची रूपरेषा असणारी कार्यक्रम पत्रिका, मान्यवर साहित्यिक आणि अन्य निमंत्रितांना देण्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेचेही काम प्रलंबित आहे. या बाबींना लागत असलेल्या विलंबाबाबत आयोजकदेखील लवकरच जाहीर करण्यात येईल, यापलीकडे काहीही सांगण्यास तयार नाहीत.
संमेलनाला अवघे २१ दिवस बाकी असताना अजूनही संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाच जाहीर झालेली नसल्याने साहित्य रसिकदेखील संभ्रमात आहेत. महामंडळाकडून उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या नावावर अद्यापही खलच सुरू असल्याने संमेलनाच्या दिवसापर्यंत घोळ सुरूच राहणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
मान्यवरांना निमंत्रण कधी?
निमंत्रण पत्रिकेचे काम लांबणीवर पडले असल्याने त्या निमंत्रण पत्रिका आयोजकांकडून मान्यवरांना स्वहस्ते नेऊन देण्याची परंपरादेखील खंडित होण्याची चिन्हे आहेत. केवळ समाजमाध्यमांचा वापर करून त्या निमंत्रण पत्रिका दिल्या जातील. मात्र, मान्यवरांना अशाप्रकारे निमंत्रण दिल्यास संबंधित मान्यवर संमेलनाला येण्याची शक्यताच कमी होते, हे भान आयोजकांना ठेवावे लागणार आहे.