लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : कर्मचारी भविष्य निधी १९९५ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसल्याचा निर्वाळा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दिला आहे. इपीएस १९९५ अंतर्गत पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तशा अफवा पसरविल्या जात आहेत. याबाबत पेन्शनधारकांकडून कार्यालयात विचारणा केली जात आहे. प्रत्यक्षात या योजनेतील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. म्हणून कोणीही याबाबत चौकशी अथवा संपर्क साधू नये आणि कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असा व्यवहार केल्यास कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एसएलपी ३३०३२-३३ च्या २०१५ दि. २३/३/२०१७ अंतर्गत येणाऱ्या आणि ज्या कर्मचाऱ्यांची पेन्शन कपात वाढीव वेतन म्हणजेच ५००० /६५०० पेक्षा अधिक वेतनावर कपात करण्यात आली आहे व ती कपात कार्यालयात जमा करण्यात आली आहे अशाच कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे सहायक आयुक्त रमेश कुमार यांनी दिली आहे.