नाशिक : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील फलक काढून जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी जैन समाजातील काही युवकांवर खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात जैन समाजातील कोणत्याही युवकावर अन्याय होऊ देणार नाही, तसेच निरपराध लोकांना कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी दिली आहे.
अमळनेर येथे जैन दीक्षार्थींच्या सन्मानार्थ लावलेले फलक फाडून पायदळी तुडवणारा व जैन धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या अमळनेर नगर परिषदेच्या अधिकाऱ्याविरुद्ध ज्या युवकांनी तक्रार दाखल केली, त्या युवकांविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, तसेच या सर्व युवकांना खोट्या गुन्ह्यांतून मुक्त करावे, या मागणीसाठी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनानुसार, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेऊन याप्रकरणी सविस्तर चर्चा केली व जैन समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
सदर शिष्टमंडळात राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, प्रदेश सहसचिव अल्पेश पारख, फेडरेशनच्या नाशिक शाखेचे प्रमुख प्रशांत मुथा, अमळनेर जैन संघाचे अध्यक्ष मदनलाल ओसवाल, अशोक डागा, मांगीलाल गोलेछा, जितेंद्र कटारिया, मुन्ना ओसवाल आदी प्रमुख मान्यवर सहभागी होते. अमळनेर येथे १६ फेब्रुवारीला रात्री ही निंदनीय घटना घडली होती. तेव्हापासून अखिल भारतीय अल्पसंख्याक महासंघाने याप्रकरणी विशेष लक्ष घालून जैन समाजातील लोकांना आवश्यक ते सहकार्य करून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. जैन अल्पसंख्याक महासंघाच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे प्रमुख माजी खासदार विजय दर्डा यांनी याप्रकरणी विविध स्तरावर आवश्यक ती मदत देऊन विशेष सहकार्य केल्याबद्दल जैन समाजाच्या वतीने विजय दर्डा यांना विशेष धन्यवाद देण्यात आले.