नाशिक : काेरोनाचे निमित्त करून महापालिकेत ‘होऊ द्या खर्च’ला सुरुवात झाली आहे. विद्युत दाहिनी बसविण्याच्या निविदेचा घोळ मिटत नाही, तोवर तीनशे सफाई कामगार विनानिविदा घेण्यावरून प्रशासनातील काही अधिकाऱ्यांत जुंपली आहे. अशात शहरातील गंभीर परिस्थिती बघता कोणतेही मानधन न घेता सफाई सेवक पुरविण्याची तयारी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने दर्शविली आहे आणि पैशांशिवाय देखील सामाजिक भावनेतून कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात, हे दाखवून दिले आहे.
यासंदर्भात समितीचे नेते सुरेश मारू आणि सुरेश दलोड यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. शहरात कोराेनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून अशावेळी शहरात स्वच्छतेचे काम नेटाने होणे आवश्यक होते. नागरिकांची जीवितहानी करणाऱ्या महामारीसारख्या रोगाविरूद्ध यापूर्वी बाल्मिकी, मेघवाळ, मेहतर समाजाने आपत्ती काळात काम केले आहे. १९४१ मध्ये शहरात प्लेगनंतर कॉलराची साथ आल्यानंतर देखील समाजाने धोका पत्करून विनामूल्य स्वच्छतेचे काम केले आहे. तसेच तत्कालीन नगरपालिकेला सहकार्य केले आहे. आताही तशीच स्थिती आहे. कोरोनाची आपत्ती सर्वांवरच आली आहे. अशावेळी महापालिकेकडे मनुष्यबळ पुरेसे नाही. समाजाला संकटातून वाचविण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून स्वच्छतेचे पारंपरिक काम करणारा हा समाज विनामूल्य कामगार पुरविण्यास तयार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
इन्फो...
महापालिकेची रूग्णालये, केाविड सेंटर्स याठिकाणी काम करण्यास सफाई कामगारांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे
नाशिक महापालिकेत एका आऊटसोर्सिंग करणाऱ्या ठेकेदाराकडून तीनशे कामगार विनानिविदा भरती करण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर त्यात आणखी काही अधिकाऱ्यांनी उडी मारली. वेगवेगळ्या माध्यमातून तीनशे कामगारांना घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात आता विनामूल्य कामगार उपलब्धतेची तयारी संघर्ष समितीने दर्शविल्यानंतर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.