नाशिक :
मुस्लिम बांधवांच्या निर्जली उपवासाचा पवित्र महिना रमजान पर्वाचे चंद्रदर्शन आकाश निरभ्र असले तरी बुधवारी (दि.२२) शहरासह जिल्ह्यात कोठेही घडू शकले नाही. यामुळे नाशिकच्या विभागीय चांद समितीने संध्याकाळी रमजान पर्वला शुक्रवारी (दि.२४) प्रारंभ होईल, अशी घोषणा केली. समाजबांधवांनी शुक्रवारच्या पहाटेपासून उपवास (रोजा) ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रदर्शन घडण्याची बुधवारी संध्याकाळी श्यक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर विभागीय चांद समितीकडून चंद्रदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी मोकळ्या मैदानात जाऊन व इमारतींच्या गच्चीवरून आकाशाकडे डोळे लावून चंद्रदर्शन घडतेय का हे बघितले मात्र चंद्रदर्शन कोठेही कोणालाही घडले नाही. तसेच मुंबई किंवा अन्य भागातूनही चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाली नाही. तेथील समितीनेही याबाबत शुक्रवारी रमजान पर्वला सुरुवात होईल, असे जाहीर केले.
नाशिक शहरातील घासबाजारातील शाही मशिदीत बुधवारी संध्याकाळी झालेल्या धर्मगुरू, उलेमांच्या बैठकीत रमजान पर्वबाबत निर्णय घेतला गेला. चालू इस्लामी महिना शाबानचे गुरुवारी ३०दिवस पुर्ण केले जातील व शुक्रवारपासून रमजानचा महिना सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना मुश्ताक अमजदी, मौलाना मुफ्ती शमशुद्दीन मिस्बाही, मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना रहेमतउल्ला मिस्बाही आदी धर्मगुरू व नागरिक उपस्थित होते.
आज रात्रीपासून ‘तरावीह’चे नमाजपठणरमजान काळात मशिदींमध्ये दररोज रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे महिनाभर पठण केले जाते. या नमाजचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मग्रंथ कुराणचे मुखोद्गत वाचन होय. धर्मगुरूंकडून कुराणपठण केले जाते. ही नमाज केवळ रमजानकाळात अदा केली जाते, यामुळे या नमाजला मोठे महत्व आहे. यासाठी मशिदींमध्ये वाढीव बैठकव्यवस्था करण्यात आली आहे.