नाशिक : शहरातील कोणतेही नाले बुजविले अथवा कॉँक्रीट करून बंदिस्त केले जाणार नाहीत, ते उघडेच राहतील. नागरिकांनी त्यात कचरा टाकणे बंद करावे. नाल्यांची स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची राहील, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) इंदिरानगर जॉगिंंग ट्रॅक येथे आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात बोलताना केली. उघड्या नाल्यांमुळे होणारी अस्वच्छता आणि डासांचा वाढता उपद्रव यापासून सुटका करण्यासाठी बऱ्याच तक्रारी समोर आल्यानंतर आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले. ‘वॉक विथ कमिशनर’च्या चौथ्या उपक्रमाप्रसंगी महापालिकेकडे ६९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात प्रामुख्याने, अतिक्रमण काढणे, नाले बंदिस्त करणे, मोकळ्या भूखंडावर पावसाळी पाणी साचणे, जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता करणे, घंटागाडीची अनियमितता, सिटी गार्डनमधील खेळण्यांची दुरवस्था, मोकाट जनावरांचा उपद्रव आदी विविध समस्यांचा समावेश होता. यावेळी नाल्यांच्या साफसफाईबद्दल आणि ते बंदिस्त करण्यासंदर्भात काही तक्रारी समोर आल्या. सदाशिवनगर तसेच जॉगिंग ट्रॅकजवळील नाला बंदिस्त करण्याची मागणी आली असता, त्यावर आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत नाले बंदिस्त केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर सामाजिक सभागृहासह महिलांसाठी सभागृह उभारण्यासंबंधीच्या सूचना आल्या असता, आयुक्तांनी मोकळे भूखंड हे मोकळेच राहतील, तिथे बांधकामे होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. ज्या ठिकाणी पब्लिक अॅमेनिटीजसाठी आरक्षण आहे तेथे बांधकामे करता येऊ शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुरू गोविंद सिंग कॉलेजसमोरील जागेत महिलांसाठी सभागृह बांधण्यास मंजुरी असल्याची बाब सूचना करणाºया महिलेने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता आयुक्तांनी मोकळ्याभूखंडांबाबतची माझी पॉलिसी असल्याचे सांगत तेथे महिला सभागृह होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. शहरात १८ ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असून, त्या ठिकाणी रोज साफसफाई होण्यासाठी माणसे नियुक्त केल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. महापालिकेच्या कर्मचाºयाने नाला बुजवून अतिक्रमण केल्याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी सदर कर्मचाºयास तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. सिटी गार्डन रात्री ९ नंतर बंद करण्याची आणि गार्डनसाठी शुल्क आकारणीची मागणी एका नागरिकाने केली असता आयुक्तांनी तेथेच जनमत घेतले आणि अनुकूल प्रतिसादानंतर शुल्क आकारणीची कार्यवाही करण्याची सूचना केली. गतिरोधकासंबंधीचेही बरेच प्रश्न आयुक्तांनी धुडकावून लावले. रोड ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटीच्या मान्यतेनेच यापुढे गतिरोधक टाकले जातील असेही त्यांनी वारंवार स्पष्ट केले. भटक्या मोकाट जनावरांचा प्रश्न आला असता, नागरिकांनीच कोंडवाड्यात जनावरे आणून सोडावीत, असा सल्ला आयुक्तांनी दिला. मिळकत कराच्या बिलासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता लागू केलेली सवलत योजना बंद केल्याने त्याविषयीही नागरिकांनी आयुक्तांना जाब विचारला; परंतु अशी सवलत देता येणार नसल्याच्या भूमिकेवर आयुक्त ठाम राहिले.
नाशिक शहरातील कोणतेही नाले बंदिस्त केले जाणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:40 AM