त्र्यंबकेश्वर : प्रशासनाने १३ सप्टेंबरच्या दुसऱ्या मुख्य शाहीस्नानाचे नियोजन अत्यंत चांगले केले होते. काही पोलिसांकडून अतिरेक झाला, त्यांनी तसे करू नये व येत्या २५ सप्टेंबर रोजी होणारे तिसरे आणि अंतिम शाहीस्नानाचे नियोजनही दुसऱ्या शाहीस्नानाप्रमाणे करावे, असे मत शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेत व्यक्त केले.
याच बैठकीत पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनाही धन्यवाद देण्यात आले. त्र्यंबक नगरपालिकेने केलेली स्वच्छता अत्यंत चांगली होती. अशी स्वच्छता कुठेच पहावयास मिळाली नाही, असेही या बैठकीत नमूद केले.दरम्यान, आखाड्याच्या नवीन बांधकामांना मालमत्ता कर लावू नये किंवा घरपट्टी आकारू नये तसेच बांधकाम केलेल्या इमारती या धार्मिकस्वरूपाच्या असून, आखाड्यांच्या मालमत्ता आहेत. तसेच कुंभ सुरू झाल्यापासून म्हणजेच ध्वजारोहणापासून ते ३० सप्टेंबरपर्यंत वीज वितरण कंपनीने बिल आकारू नये. ३० सप्टेंबरनंतर आम्ही वीज बिल नियमित भरू, असे आखाडा परिषदेच्या बैठकीत एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्रगिरी महाराज, स्वामी सागरानंद ,अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरी महाराज, महंत प्रेमानंद, महंत दुर्गादास आदि १० आखाड्यांचे संत-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)