नाशिक- ड्रग्ज माफीया ललीत पाटील याला माजी महापौर विनायक पांडे यांनी शिवसेनेत आणल्याच्या आरोपांचा त्यांनी इन्कार केला असून २०१६ नंतर त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही, की संपर्क नाही, असे स्पष्टीकरण विनायक पांडे यांनी आज नाशिकमध्ये दिले आहे. पोलीसांनी कॉल रेकॉर्ड तपासून कधीही आपल्याला चाैकशीसाठी बोलवले तर आपण तयार आहोत असेही ते म्हणाले.
ललीत पाटील हा शिवसेनेत होता. त्यावेळी त्याचा विनायक पांडे यांनीच प्रवेश घडवला होता असा आरोप मध्यंतरी शिंदे गटाने केला हाेता तर बुधवारी (दि.२५) पांडे यांच्या वाहनचालकाची चौकशी करण्यात आली होती. त्यांनतर पांडे यांचीही चौकशी हेाणार, अशा चर्चा सुरू असताना पांडे यांनी आज शालीमार येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्टीकरण दिले. रिपब्लीकन युवा आघाडीचा माजी युवा जिल्हाध्यक्ष असलेल्या ललीत पाटीलच्या पत्नीला उपनगर परीसरातून निवडणूक लढवायची असल्याने एकाच्या मध्यस्थीतून तो आपल्या संपर्कात आला होता. मात्र, त्यावेळी महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि तत्कालीन संपर्क मंत्री यांच्या माध्यमातून तो प्रवेश सोहळा झाला. कारण पक्षाचे स्थानिक पदाधिकारी वरीष्ठांशी चर्चा करून प्रवेश सोहळे निश्चीत करीत असतात. त्यावेळी दादा भुसे हे राज्यमंत्री हेाते आणि ते उपस्थितही होते, असेही पांडे म्हणाले.
दरम्यान, माझा आणि पाटीलचा त्यांनतर संपर्क नाही, २०१८ मध्ये त्यांनी माझ्या नातेवाईकांचा विदेशात बकऱ्या पाठवण्याचा धंदा बळकावला त्यामुळे मी त्याला फोन केल्यावर शाब्दीक बाचाबाची झाली तो शेवटचा फोन हाेता. त्यानंतर कधीच फोन झाला नाही असे सांगून पांडे म्हणाले, माझ्याचालकांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र, मी त्याला दीड दोन वर्षापासूनच कामावरून काढून टाकले आहे, असेही पांडे म्हणाले.