नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केले आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयातील गुणांमुळे उत्तीर्ण होता येणार आहे.
या नियमांमुळे सीबीएससी दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याने पालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सीबीएसई दहावीसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांनुसार, कौशल्य विकासअंतर्गत कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, फायनांशियल मार्केटिंग यासारखे विविध १७ कौशल्य आधारित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात रिटेल, सिक्युरिटी, ऑटोमोटिव्ह, टुरिझम, बँकिंग अँड इन्शुरन्स, हेल्थ केअर आदी विषयांचाही समावेश आहे. त्यापैकी एक विषय निवडून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांचा लाभ होणार आहे. सीबीएससीने काही वर्षांपूर्वी बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार परीक्षा होणार असून त्याचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
--
सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०
सीबीएसई शाळा - १८
--
काय आहेत नवीन नियम
सीबीएसईसाठी दोन भाषा (इंग्रजी, हिंदी), विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषय हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला कौशल्य आधारित अतिरिक्त पर्यायी विषय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पर्यायी सहाव्या कौशल्य विषयात उत्तीर्ण असल्यास ते गुण ग्राह्य धरून पास केले जाणार आहे. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयांची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने यंदा मदत होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती सीबीएससीचे शिक्षक व प्राचार्यांनी दिली आहे.
--
कौशल्य विषयाची होणार मदत
सीबीएससी बोर्डाच्या नियमानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. एखाद्या विषयात विद्यार्थी अपेक्षित गुण मिळवून शकला नाही तर त्याला या नियमानुसार चांगली मदत होणार आहे.
- प्रशांत जाधव, पालक
--
विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य आधारित विषयातील गुणांचा आधार होऊन तो उत्तीर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थी नापास होणार नाही. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असला तरी त्याचे वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ६० गुणांपैकी २० गुण अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही निर्णयाचे स्वागत होत असल्याचे विविध सीबीएसई स्कूलच्या प्राचार्यांनी सांगितले.