त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरीकेडींग करून बंद करण्यात आले आहेत. यंदा अतिशय साधेपणाने यात्रा साजरी होणार आहे.यंदा यात्रा रद्द झाल्याने वारकऱ्यांच्या दिंड्यांची संख्याही रोडावली असून अनेक दिंड्या मोजक्या वारकऱ्यांच्या संख्येने दर्शन करून लगेच परतीचा मार्ग धरत आहेत. वारकरी दर्शनासाठी येत आहेत परंतु गेल्या सातशे वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला माहोल यंदा नाही. दरवर्षी दिंड्यांमधील लाऊडस्पीकरचा आवाज घुमत असतो. कीर्तन, भारुड, भजन, चित्रपटांतील गाणी असा एकच गोंगाट असतो. कडाक्याच्या थंडीमुळे शेकोट्या पेटलेल्या दिसतात. परंतु, यंदा हे सारे चित्र पालटले आहे.दि. ७ व ८ फेब्रुवारीला एकादशी असून तरी दि ८ रोजी असणारी भागवत एकादशी वारकरी भाविकांसाठी मुख्य आणि महत्वाची असते. त्यामुळे या दोन्ही दिवशी त्र्यंबकेश्वरी वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते सपत्नीक संजीवन समाधीची महापूजा होईल. यावेळी मोजक्याच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.निर्मळ वारीतही खंडगत ३-४ वर्षापासून जिल्हा प्रशासनाने निर्मळ वारी हा उपक्रम राबविण्यास त्र्यंबक नगरपरिषदेला आदेश दिले होते. त्यानुसार शहरात निर्मळ वारी राबविण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था येत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे निर्मळ वारीतही खंड पडणार आहे. प्रदुषण मुक्त व पर्यावरण पूरक यात्रा पार पडावी हा मुळ उद्देश प्रशासनाचा असतो. मात्र या वर्षी यात्रेला गर्दीच होणार नसल्याने ना निर्मळ वारी ना पर्यावरण पुरक यात्रा.कोट्यवधीची उलाढाल थंडावलीयात्रेत दरवर्षी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते. अनेक ठिकाणी चहा, प्रसाद, वाणाचे सामान, खेळण्या, फराळाचे पदार्थ यांचे स्टॉल्स लागतात. परंतु यावर्षी गर्दीवरच नियंत्रण आणल्याने फारशी दुकाने लागलेली नाहीत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल थंडावणार आहे. पूजेसाठी प्रथमच वारकऱ्यांना मानसंत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणारे तीन रस्ते बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले आहेत. भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. तर त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाने धर्मदर्शन रांगेने भाविकांना प्रवेश राहणार आहे. संत निवृत्तीनाथ मंदिरात पहाटे ५ वाजता होणाऱ्या पूजेत वारकऱ्यांना प्रथमच मान देण्यात आला असून त्यांना पुजेत समावून घेणेत आले आहे तर दि. ८ रोजी पहाटेची महापूजा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने होणार आहे.
मानाच्या दिंड्यांना संत निवृत्तीनाथ मंदिरात २० वारकरी अशी संख्या धरून प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मंदिराला विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर बस स्थानक गजानन महाराज मंदिर समोरील जागेत जव्हारफाटा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान यात्रेकरूंच्या खाजगी वाहनांना नगरीत प्रवेश दिला जाणार नाही तर त्यांना गट नंबर १२५ येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे.