नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. साहित्य संमेलन दीड महिन्यावर आले असताना त्यातील अवघ्या तीन समित्यांच्या बैठका झाल्या असून तब्बल ३६ समित्या अद्यापही केवळ कागदावरच राहिल्या आहेत.
साहित्य संमेलन नाशिकला होण्याबाबतची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून विविध विषयांच्या समित्या गठीत करायच्या असून त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नावे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत सांस्कृतिक ग्रुप असलेल्या विविध समाजमाध्यमांवर त्यासाठीचे आवाहन करून नाशिकचे संमेलन हे सर्वांचे कार्य असल्याने अधिकाधिक इच्छुकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनांना नाशिककरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत त्यांना आवडणाऱ्या विभागासाठी काम करण्याची तयारी दाखवली. तर, काही नावे आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने त्यात समाविष्ट करून समित्यांचे गठन करण्यात येणार होते. तसेच या सर्व समित्यांचे बैठका, कामकाज नियोजनानुसार व्हावे, यासाठी त्यांचे समन्वय राखण्यासाठी विश्वास ठाकूर यांचीदेखील त्यावर नियुक्ती करण्यात आली. ठाकूर यांनी व्यवस्थितपणे याद्या तयार करून अंतिम मंजुरीसाठी त्या याद्या लोकहितवादी मंडळाकडे सूपुर्द केल्या. त्यानंतर सर्व समित्यांमधील कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यातील केवळकवी कट्टा, स्मरणिका, ग्रंथदिंडी या ३ समित्यांच्या बैठका झाल्या. उर्वरित ३६ समित्यांची पहिली बैठकदेखील झालेली नाही.
मग गठन कशासाठी?
समित्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे विचारच ऐकून घ्यायचे नसतील तर या समित्या नक्की कशासाठी गठीत झाल्या, की केवळ दिखाव्यासाठीच त्यांचे गठन करण्यात आले आहे, असा प्रश्न अनेक समित्यांमधील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. भविष्यात कोणत्याही नियोजनात त्रुटी राहून जर काही समस्या निर्माण झाली, तर ऐनवेळी कार्यकर्त्यांची अनुपलब्धता होण्याचीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.