नाशिक : राज्यात ओमायक्रॉनचा झालेला शिरकाव आणि जिल्ह्यात कोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून व्हॅक्सिन घेतली असेल, तरच महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हेच एकमेव प्रभावी माध्यम असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असतानाही जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग कमी असल्याबाबत त्यांनी आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने लसीकरण झालेल्यांनाच नाशिकमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या नागरिकांनी लसीचा अजूनही एकही डोस घेतलेला नाही त्यांना शासकीय कार्यालये, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सार्वजिनक आस्थापनांवर सोपविण्यात आलेली आहे.
--इन्फो--
जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी नाशिकमध्येच
ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करावी लागते. अशा प्रकारच्या संशयित रुग्णांचे अहवाल पुण्याला पाठविले जातात. तेथून अहवाल प्राप्त होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागतो. ओमायक्रॉनचे लवकर निदान होण्यासाठी नाशिकमध्येच जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यासाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद १० हजार किटस् खरेदी करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
--इन्फो--
डोस वाढविण्यावर भर
लॉन्स, मॉल्सवर अधिक लक्ष
कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने मॉल्स, तसेच बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. याशिवाय लग्नसोहळ्यांमध्ये उपस्थितीची संख्या मोठी असल्याने अशा गर्दीच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या लसीकरणाबाबतची माहिती घेण्याचे काम संबंधित आस्थापनांना करावे लागणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करण्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून नियोजन केले जात आहे.