नांदूरवैद्य :(किसन काजळे ) एकीकडे संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच दुसरीकडे धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासळी, चिंचले, धानोशी, मायदरा, अवनखेड आदी गावांसह इतरही अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा दरवर्षीप्रमाणे पोहोचत आहेत. धरणांचा तालुका आणि निम्म्या महाराष्ट्राची तहान भागविणारा तालुका म्हणून परिचित असणाºया इगतपुरी तालुक्यावरच पिण्यासाठी पाणी शोधण्याची केविलवाणी वेळ आली आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात तर नागरिक बैलगाडीच्या साहाय्याने पाण्याचे बॅरल ठेवून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून पाणी आणत आहेत.इ गतपुरी येथील कथृवांगण पाड्यातील आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच असून, येथील महिलांना चक्क जीव धोक्यात घालून रेल्वे लाइन ओलांडत पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे.दिवसेंदिवस राज्यात कोरोना- बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन स्वच्छतेचा मंत्र जपतानाच सतत हात धुण्याच्या सूचना करीत आहेत, पण जेथे पिण्याच्या पाण्याची मारामार तेथे हात धुवायला पाणी कुठून आणणार, असा प्रश्न आहे. एक घोट पाणीसुद्धा येथील बांधवांना मिळेनासे झाले आहे. कथृवांगण पाडा इगतपुरी नगर परिषद हद्दीत येतो. सुमारे २५ वर्षांपूर्वी या पाड्याचा समावेश नगर परिषदेत करण्यात आला, परंतु परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. या पाड्यात एकूण ४५ घरे आहेत. ज्यात जवळजवळ २०० लोक वस्ती करून राहतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगर परिषदेने पाच वर्षांपूर्वी दोन नळ कनेक्शन दिले. जवळच एका जुन्या टाकीत हे पाणी साठविले जाते. आठवड्यात दोन वेळा जास्तीत जास्त २० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. सध्या ते ही एकदाच मिळत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या तहसीलदार यांनी धानोशी, मायदरा, अवनखेड आदी ठिकाणी दोन टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवले असून, लवकरच नागरिकांना पाणी मिळेल, अशी आश्वासने दिली जात आहेत.-------------------------------------------फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारातालुक्यातील नांदूरवैद्य येथेही दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नवीन विहिरीचे खोदकाम करण्याआधी करायला पाहिजे होते असे नागरिकांनी सांगितले. परंतु खोदकाम करण्याआधी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीही उपाययोजना न करता तसेच ग्रामस्थांची बैठक न घेता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली. त्यामुळे आज कोरोनाचे संकट आणि पाणीटंचाई असा दुहेरी संकटांचा सामना नांदूरवैद्य येथील नागरिकांना करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत दारणा नदीवरून मुख्य पाइपलाइनला पाइप जोडून वापरासाठी पाणी येणार होते, परंतु त्यासही विलंब होत असल्यामुळे अजून किती दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार असा सवाल नागरिक विचारीत आहेत.-----------------------------१ इगतपुरीजवळील कथृवांगण पाड्यातील आदिवासी महिलांना रेल्वेचे रूळ ओलांडत पाणी आणण्यासाठी धोक्याची कसरत करावी लागत आहे.२ इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये आजही बैलगाडीच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणावे लागत आहे.३ नांदूरवैद्य येथील पाणीपुरवठा करणाºया नवीन टाकीचे बांधकाम लॉकडाउनमुळे रखडले आहे.
प्यायलाच नाही पाणी, तेथे हात धुणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 8:50 PM