नाशिक : राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. गेल्या २२ दिवसांत राज्यात भारनियमन झालेले नाही. यापुढेही होणार नाही, असा आमचा प्रयत्न असून, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील १२ ते १३ राज्यांमध्ये भारनियमन सुरू असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नाशकात गुरुवारी (दि.१२) केली.
ऊर्जामंत्री राऊत यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने कोळशाचे योग्य नियोजन न केल्याने देशातील काही राज्यांमध्ये भारनियमन सुरू आहे. मात्र नियोजनामुळे राज्य भारनियमन मुक्त केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने कोळशाचे नियोजन अद्याप पूर्णपणे केलेले नाही. रेल्वे प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सुरू झाल्या असल्या तरीही देशात कोळशाचा पुरवठा जसा हवा तसा होताना दिसत नाही. त्यामुळे देशातील बारा-तेरा राज्यांत सातत्याने लोडशेडिंग होत आहे. असे सांगून मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी विजेची बत्ती गूल झाल्याच्या प्रकाराबद्दल माहिती घ्यावी लागेल, कारण मुंबईत महावितरण वीज पुरवठा करीत नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.
राज्यातील आंबेडकर चळवळीने एकत्र यावे, या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबद्दल बोलताना राऊत यांनी, या चळवळीचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय त्यांचे नेते व चळवळीचे कार्यकर्ते ठरवतील, मात्र असे प्रयत्न अनेक वेळा झाले असले तरी, त्यासाठी ज्यांनी आवाहन केले, त्यांनीदेखील पुढाकार घेतला नाही व कोणाला घेऊ दिला नसल्याचे सांगून राऊत यांनी केंद्र सरकारकडून अनुसूचित जातीच्या योजनांबाबत हात आखडता घेतला जात असल्याचा आरोप केला. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद अपेक्षित असताना त्यासाठी तरतूद ठेवली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळत नाही, त्यातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अशा प्रश्नावर चळवळीतील नेते, पदाधिकारी बोलत नसल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली.
चौकट==
नाना पटोलेंच्या विधानाचे समर्थन
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. त्याचे समर्थन नितीन राऊत यांनी केले. ते म्हणाले, नाना पटोले हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते बाेलले ते सत्यच आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे, असे ठरलेले आहे.