लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नमामि गंगेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाच्या सुरू झालेल्या चळवळीनंतर नमामि देवी नर्मदा आणि त्यानंतर हळूहळू नमामि चंद्रभागासारख्या चळवळी सुरू होत असताना गंगेची थोरली भगिनी मानली जाणारी गोदावरी मात्र जणू उपेक्षेची धनीच ठरली आहे. गोदावरी जीवनदायिनी आहे, हे खरे असले तरी त्यादृष्टीने पाऊले पडत नाही. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नदी शुद्धिकरणाचे अभियान राबविले जात असले तरी गोदावरी मात्र याबाबतही मागेच आहे. त्यामुळे ‘नमामि गोदे’ची चळवळ आता गोदाप्रेमींमधूनच पुढे आली असून, त्यासाठी रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. नाशिकमधील पर्यावरणप्रेमी, गोदाप्रेमींनी एकत्र येऊन नमामि गोदा फाउण्डेशनची स्थापना केली असून, त्याची रीतसर नोंदणी केली आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आणि अर्थातच राजेश पंडित, प्राजक्ता बस्ते, शिरीष दंदणे, मिलिंद दंडे यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तथापि, ही चळवळ सर्वांची आहे आणि नदीवर, पर्यावरणावर ज्याचे प्रेम आहे, तो सर्वच या चळवळीचा एक भाग असल्याचे फाउण्डेशनच्या प्रवर्तकांचे म्हणणे आहे.गोदावरी नदी हा श्रद्धेचा विषय असल्यानेच या विषयावर नाशिकमधील नागरिक संवेदनशील आहेत. परंतु दुसरीकडे नदीपात्र अस्वच्छ करण्यालाही नागरिकच कारणीभूत ठरतात. सरकारी यंत्रणा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गोदापात्र शुद्धिकरणासाठी प्रयत्न करू शकत नाही. अशावेळी लोकसहभागच अधिक महत्त्वाचा आहे. गोदावरीविषयी आदर निर्माण करण्यासाठी नव्या पिढीवर संस्काराची गरज आहे. हे ओळखून नमामि गोदा फाउण्डेशन नव्या पिढीवर गोदावरीच्या कृतज्ञतेचे संस्कार रुजविणार आहे. त्यामुळे अनेक शाळांना यात सहभागी करून घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून ही चळवळ पुढे नेली जाणार आहे. अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांच्या प्रेरणेने ही चळवळ सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ९ आॅगस्ट म्हणजे क्रांतिदिनी राजेंद्र सिंग यांच्या उपस्थितीतच ही चळवळ पुढे नेण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. लोकमतची अपेक्षापूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगेची घोषणा वाराणसीत केली. त्या पाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी नमामि देवी नर्मदेची घोषणा करून १४४ दिवसांची परिक्रमा केली. आपापल्या भागातील नद्यांच्या संवर्धनासाठी तेथील सरकारे प्रयत्न करीत असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमामि गोदाअभियान का राबवित नाही असा प्रश्न करीत लोकमतने नमामि गोदा या संकल्पनेचा वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तसेच गोदावरी शुद्धिकरणासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच लोकचळवळ उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याचीच सुखद परिणती ‘ नमामि गोदा फाउण्डेशन’च्या माध्यमातून होणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ सर्वच गोदाप्रेमींसाठी खुली असल्याने गोदेचे प्रचलित स्वरूप बदलण्यास ती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
गोदावरीच्या सन्मानासाठी आता नमामि गोदा!
By admin | Published: July 14, 2017 11:52 PM