सिडको : महानगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादी आणि पुरवणी यादीत प्रभाग क्र. २४ च्या मतदार यादीत घोळ असल्याबाबत अनेकांसह शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनीही हरकती घेतल्या होत्या. मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही घोळ कायम आहे. विशेष म्हणजे अंतिम यादीत नाशिककरोडच्या मतदारांची नावे सिडकोतील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. यामुळे अंतिम यादीतही घोळ कायम असल्याचे बोलले जात आहे. प्रारूप मतदार यादीत देवळाली मतदारसंघातील नावे समाविष्ट झाली असल्याने व प्रभागात राहणाऱ्या शेकडो मतदारांची नावे अन्य प्रभागांत टाकण्यात आली आहेत. तसेच सोळाशेहून अधिक मतदारांची केवळ आडनावे प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत प्रवीण तिदमे यांनी हरकत घेतली. यात प्रभाग २४ हा नाशिक पश्चिम विधानसभा (क्र. १२५) मतदारसंघात येतो. असे असताना प्रारूप यादीत देवळाली विधानसभा (क्र. १२६) मधील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच प्रभागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. प्रभाग २४ मध्ये राहत असूनही एकाच कुटुंबांतील मतदारांचे प्रभाग २५, तर काहींची प्रभाग २९ मध्ये नावे अशाप्रकारे घोळ घालण्यात आला आहे. विधानसभा यादीत मतदारांचे संपूर्ण नाव असताना प्रारूप यादीत सुमारे १६५३ हून मतदारांचे केवळ आडनावेच प्रसिद्ध करण्यात आली होती. अशा अनेक तक्रारींबाबत प्रवीण तिदमे यांनी हरकती घेतल्या आहेत. (वार्ताहर)
नाशिकरोडच्या मतदारांची सिडको मतदार यादीत नावे
By admin | Published: January 24, 2017 12:53 AM