नाशिक : महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सेमी इंग्रजीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मनपा शिक्षण मंडळाने येत्या मंगळवारी (दि.१६) होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. सदर शाळा सेमी इंग्रजी झाल्यास मनपा इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांची माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची सोय होणार आहे.महापालिकेच्या वतीने सन २००८ पासून पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. त्यात मनपा विद्यानिकेतन ४ रायगड चौक, सिडको या शाळेत इयत्ता पहिलीचा वर्ग असून, याठिकाणी ७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर मनपा शाळा क्रमांक ६७ फुलेनगर येथे ज्युनिअर के.जी.मध्ये १६०, शाळा क्रमांक २९ मखमलाबाद नाका येथे इयत्ता पहिली ते सहावी या वर्गात १८४, शाळा क्रमांक २२ विश्वासनगर येथे पहिली ते चौथी या वर्गात १७६ तर मनपा विद्यानिकेतन क्रमांक १५ चेहडी येथे पहिली ते चौथी या वर्गात १६० याप्रमाणे एकूण ७५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सहावीपर्यंत वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. मात्र, सदर खासगी शाळांचे शुल्क गरीब विद्यार्थ्यांना परवडत नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सेमी इंग्रजीमध्ये रूपांतरित केल्यास मनपाच्या शाळांमध्ये माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण घेणे सहजसुलभ होऊ शकणार असल्याचे शिक्षण मंडळाच्या प्रस्तावात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
मनपा इंग्रजी शाळांचा सेमी इंग्रजीचा प्रस्ताव
By admin | Published: February 09, 2016 11:28 PM