लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी दाखल झालेल्या ७८० नामांकन अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान छाननीची प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांनी सातही निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. काही नामांकन अर्जांवर हरकती नोंदविण्यात आल्यामुळे दीर्घकाळ निर्णयासाठी चर्चा करण्यात आली. सोमवारी झालेल्या छाननीप्रक्रियेत प्रभाग १ मधून चेतन आनंदा अहिरे यांनी दाखल केलेला अर्ज अवैध ठरविण्यात आला, तर प्रभाग २१ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अन्सारी एजाज अहमद फैय्याज अहमद यांना आठ अपत्ये असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शेख जहीर जलानी यांनी प्रभाग २ ड मधून अर्ज दाखल केला होता, त्यांचाही नामांकन अर्ज अपत्यांमुळे अवैध ठरविण्यात आला. प्रभाग ११ मध्ये पुष्पा राजू पवार यांच्या अर्जावर अनुमोदक व सूचकाची स्वाक्षरी एकसारखीच असल्यामुळे अवैध ठरविण्यात आला, तर तीनपेक्षा अधिक अपत्ये असल्यामुळे १४ ब मधून अन्सारी नजमा अन्वर हुसेन, १९ ड मधून मुख्तार अहमद अहमद मकदूम यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग १९ ड मधून मोमीन अतीक मो. मुस्तफा यांनी प्रभागाबाहेरील सूचक व अनुमोदक दिल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शेख आबीद इस्माईल, प्रभाग ३ ब च्या शकीलाबानो शाहीद अहमद यांच्या अर्जावर अनुमोदक, सूचक नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग १८ क मधून भाजपाचे मुमताजबी शेखनूर, २० अ मधून अन्सारी अब्दुल अजीज नजीर अहमद, २० ब सारिकाबानो रहीम खान, एमआयएमचे २० क मधील शेख मुशरा माजीद, २० ड अन्सारी मो. याकुब नुरूलहुदा, शेख युसुफ चाँद, अन्सारी अब्दुल अजीज नजीर अहमद आदींचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग १ ब च्या उमेदवार वैशाली चव्हाण यांच्या नावात बदल झाल्याने हरकत नोंदविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर सुनावणी घेत हरकत फेटाळून लावली, तर प्रभाग २ अ चे उमेदवार विठ्ठल बर्वे यांच्या अर्जावर तीन अपत्ये असल्याची हरकत नोंदविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. दुपारपर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती. कार्यालयाबाहेर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज छाननीप्रक्रियेचा अहवाल मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे येत होता.दरम्यान, काही अर्जांवर आज सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती नोंदविण्यात आल्या असल्यामुळे त्याचा अभ्यास करून निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत.
नामांकन छाननी प्रक्रिया शांततेत; १७ अर्ज अवैध
By admin | Published: May 09, 2017 1:18 AM