वाराणसी - उत्तरप्रदेशच्या काशी येथील घाटावर वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या पोस्टर्सबाबत बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं हातचे अंतर राखल्याचे दिसून येते. मात्र, या पोस्टर्सवर बजरंग दल काशी आणि विश्व हिंदू परिषद ही नावे झळकली आहेत. प्रवेश प्रतिबंधित गैर हिंदू ! अशा आशयाचा मजकूर या वादग्रस्त पोस्टवर छापण्यात आला आहे. याबाबत, दोन्ही संघटनांनी हात झटकले असून आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
व्हीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल यांनी याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या, या व्हिडिओत पोस्टर्स लावणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर संघटनेकडून कारवाई करण्यात येईल, असेही बंसल यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनीही तपास सुरू केला असून वाराणसीचे एएसपी राजेशकुमार पांडेय यांनी घटनेची दखल घेतली आहे. पोस्टर्स चिकटवणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. सध्या गंगा घाटावर चिकटविण्यात आलेले सर्वच पोस्टर्स काढले असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पांडेय यांनी सांगितलं.
दरम्यान, गंगा घाटावर चिकटविण्यात आलेल्या पोस्टर्संवरुन वाद रंगला होता. काशीतील मंदिर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात, म्हणून जे लोक सनातन धर्माला मानत नाहीत, त्यांना घाटावर येण्यास मनाई आह, असा मजकूर या पोस्टर्संवर लिहिला होता. तसेच, व्हिएचपी आणि बंजरंग दल यांचे चिन्हही वापरले होते. या घटनेचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओतील दोघांनीही आपण बजरंग दल आणि व्हीएचपी संघटनेचे असल्याचा दावा केला होता. राजन गुप्ता यांनी व्हीएचपीचे काशी महानगरमंत्री असल्याचं व्हिडिओत सांगितलं होतं. तर, निखील त्रिपाठी रुद्र नावाच्या व्यक्तीने काशी बजरंग दलाचा संघयोजक असल्याचं म्हटलं होतं.