नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत नसते. त्यातून कधीच काही सध्या करता येऊ शकत नाही, हे सावरकरांचे तत्त्वज्ञान आपल्याला आजच्या काळातही किती सार्थ होते, हे समजू शकते, असे प्रख्यात अभिनेते आणि सावरकर विचार प्रसारक शरद पोंक्षे यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने आयोजित शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफून करण्यात आले. सावरकरांना वेगळ्या प्रकारची लोकशाही अभिप्रेत होती. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षांची सज्ञान होईपर्यंत लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वयम अधिकार ज्ञात करून दिल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, असे सावरकर यांचे मत होते. सामर्थ्यशाली देशाच्याच अहिंसेला किंमत असते, हे तत्त्वज्ञान इंदिरा गांधीच्या काळात ज्यावेळेला भारताने अणुबॉम्ब तयार केला, त्यानंतरची सर्व युद्धे आपण जिंकली यातूनही अधोरेखित झाल्याचे पोंक्षे यांनी नमूद केले. आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीचे बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे सावरकर यांचे विचार होते. सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरू केला आहे, असेही पोंक्षे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. शनिवारी अशोक टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रख्यात प्रकाशक रामदास भटकळ यांचे व्याख्यान रंगणार आहे.
इन्फो
सावरकरांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या सूचना
१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्य बलाढ्य करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून अणुबॉम्ब तयार करावेत, त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांनी ज्ञान मिळवावे.
२ देशाची सुरक्षा करणारे सैन्यबळ आणि पोलीस यांना उत्तम पगार दिल्यास आपली बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत बनेल. तसेच तरुण पिढी लष्करात जायला तयार राहील.
३ पिढी घडविणारे जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात. त्यांना सुद्धा उत्तम पगार दिल्यास पुढील पिढ्या चांगल्या घडतील.
फोटो
२८शरद पोंक्षे