नाशिक : जिल्ह्यात दोन लस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७४ हजार २२६ इतकी असून, या सुमारे पाऊणलाख लोकसंख्येपैकी एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या डोसनंतरही आजारी पडलेल्यांची संख्या शंभराहून अधिक असली तरी त्याची तीव्रता कमी असल्याने त्यातील कोणत्याही बाधित नागरिकाचा मृत्यू झालेला नसल्याने लस हाच कोरोनावरील सध्याचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे अधोरेखित झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची पहिली लस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५ लाख १० हजार ९४८ पर्यंत पोहोचली आहे. पहिली लस घेतल्यानंतर काही त्रास झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे चार ते पाच हजार असली तरी एकूण डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ती संख्या नगण्य आहे, तसेच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना त्रासदेखील फारसा झालेला नाही, तर बाधित झालेल्या नागरिकांची संख्या अवघी ११२ आहे. त्यामुळे कोरोनावर लस घेतल्याने कोरोना होण्याची शक्यता कमी होते, तसेच कोरोना झालाच तरी त्याची तीव्रता तितकीशी राहत नसल्याने जीव गमावावा लागत नाही, हीच सर्वाधिक जमेची बाजू ठरू लागली आहे.
इन्फो
सर्वाधिक दिलासादायक
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. प्रारंभीच्या टप्प्यात केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, तर मार्च महिन्याच्या प्रारंभापासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणात सर्व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसह ४५ वर्षांवरील नागरिकांनादेखील लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत दुसरी लस घेतलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचाच समावेश आहे. विशेष म्हणजे सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक हेच कोरोनाच्या सर्वाधिक प्रभाव क्षेत्रात असूनही त्यापैकी कुणाचाच मृत्यू झालेला नाही, ही सर्वाधिक दिलासादायक बाब आहे.
इन्फो
दोन्ही लस डोस झाल्यानंतर केवळ १ टक्का बाधित
ज्या नागरिकांच्या दोन लस घेऊन झाल्या आहेत. त्यातील केवळ १ टक्का नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तसेच त्यापैकी कोणाही नागरिकाचा मृत्यु झालेला नसल्याने लसीकरण करणे हाच कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यातून दिसून येते. अशा परिस्थितीत शासन, प्रशासनानेदेखील लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याची नितांत गरज आहे.
----------
कोट
कोराेनाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी मी दोन्ही लस डोस घेतले असल्याने मला आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊनही मी त्यापासून बचावलो असून, माझ्यामुळे माझ्या कुटुंबालादेखील कोणताही त्रास किंवा धावाधाव करावी लागली नाही, याचे समाधान आहे.
-विनायक जाधव, ज्येष्ठ नागरिक
--------
कोट
मीदेखील लसीचे दोन्ही डोस घेतले असून, कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठीचा हा पर्याय प्रभावी ठरला आहे. आतापर्यंत मी सातत्याने सर्वतोपरी काळजी घेऊन कोरोनाबाधितांच्या संपर्कात राहिलो. मात्र, दोन्ही लस डोस घेतल्याने मी बाधित झालो नसून, जरी भविष्यात बाधित झालो तरी त्याची तीव्रता फार नसेल, हा विश्वास आहे.
-सुजित आव्हाड, आरोग्य कर्मचारी
---------------------
पहिला डोस- ५ लाख १० हजार ९४८
दुसरा डोस- ७४ हजार २२६
-----------------------------------------
ही डमी आहे.