नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, हे प्रमाण आता ९५.९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्रात दोन लाख २६ हजार ७६९ पैकी दोन लाख १७ हजार ३१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने घरी परतले आहेत. सध्या या पाचही जिल्ह्याात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजार ८१ इतकी आहे.
सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या नाशिक जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत ९५ हजार ३५१ रुग्ण आढळले. त्यापैकी ९० हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १,६९९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २ हजार ८५६ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्याात ५७ हजार ८५५ रुग्ण आढळले असून त्यातील ५५ हजार ९११ रुग्ण करोनामुक्त झाले. तर ८७९ जणांचा मृत्यू झाला. सध्या १ हजार ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ५३ हजार ५३४ रुग्णांपैकी पैकी ५१ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ६२३ रुग्ण उपचार घेत आहेत. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५९६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १२ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २८६ रुग्ण उपचार घेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या सहा हजार ४३३ रुग्णांपैकी सहा हजार ३९ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आणि १४३ जणांचा मृत्यू झाला.