नाशिक : ज्या परीक्षेला राज्यातील आठ लाखांहून अधिक परीक्षार्थी बसले आहेत, ज्याची परीक्षा दुसऱ्या दिवसांवर आली आहे, अशी परीक्षा घेणारी संस्था परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आम्हाला वेळ हवा, असे सांगितल्याचे कारण देत शासनाने ती परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीर केले. परीक्षेच्या आदल्या दिवशी अशा एखाद्या संस्थेच्या तकलादू कारणास्तव परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा शासनासाठी पोरखेळ असला तरी तो परीक्षार्थींच्या जीवनाशीच खेळ झाल्याची बहुतांश परीक्षार्थींची भावना झाली आहे. त्यामुळे अचानकपणे परीक्षेच्या आदल्या दिवशी घेतलेल्या निर्णयामागे परीक्षा घेणाऱ्या ‘न्यासा‘चा नकार की संबंधित संस्थेने घातलेला हॉल तिकिटांचा गंभीर घोळ? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. तसेच संबंधित संस्थेने बिहार आणि हरियाणात घेतलेल्या परीक्षांबाबत गंभीर तक्रारी असतानाही या संस्थेला परीक्षा घेण्याचे काम दिलेच कसे गेले ? असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखीपरीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेने आम्हाला पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गट-क आणि गट-ड अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. या जागा भरत असताना त्यासाठी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या बाह्य संस्थेला देण्यात आले होते. या परीक्षेसाठी अंदाजे आठ लाख परीक्षार्थींनी नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही देण्यात आले होते.
इन्फो
कोणत्याही जिल्ह्यातील विद्यार्थी कुठेही
परीक्षार्थी ज्या जिल्ह्यातील असतात त्यांना सामान्यपणे त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले जाते. मात्र, या परीक्षेत अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र असूनही अन्य जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रे देण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याने जर ‘क’ वर्ग आणि ‘ड’ वर्ग असे दोन्ही अर्ज भरले असतील, तर ‘क’ वर्गाच्या परीक्षेचा क्रमांक शनिवारी नाशिक जिल्ह्यात तर ‘ड’ वर्गाच्या परीक्षेचा क्रमांक कोणत्याही अन्य जिल्ह्यात असे प्रकारदेखील घडून आले होते. त्यामुळेच शासनाला परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
हॉलतिकिटांवर गंभीर चुका
अनेक परीक्षार्थीच्या हॉलतिकिटावर विविध चुका आढळून येत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर परीक्षा केंद्रांचा पत्ता चुकीचा आला आहे, तर काही हॉलतिकिटांवर परीक्षा केंद्र किंवा इतर माहिती देताना स्पेलिंग चुकीचे छापले गेले होते. स्थानिक विद्यार्थ्यांना याविषयी माहिती असली तरी परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता होती. किंबहुना या गंभीर चुकांमुळे अनेकांना परीक्षेला बसता न आल्याने ऐन परीक्षा सुरू असतानादेखील आंदोलने झाली असती इतक्या या चुका गंभीर होत्या.