नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या कै. माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या कक्षेत विस्तार करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार भारतातील कोणत्याही राज्यातील आदर्श आमदारास किंवा आदर्श खासदारास देऊन त्याचे स्वरूप राष्टÑीय करण्यात येत असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर आणि लिमयेंच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावानावर त्याचा बोजा पडू नये, या उद्देशाने नेर्लीकर दाम्पत्याने या पुरस्कारासाठी अजून ११ लाख रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली.नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार, लेखक आणि माजी आमदार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावानातर्फे महाराष्टÑातील सर्वोत्तम आमदारास कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जात होता. आता त्याऐवजी महाराष्टÑासह देशभरातील कोणत्याही विधानसभेतील सर्वोत्तम आमदार किंवा लोकसभा, राज्यसभेतील आदर्श खासदारास यंदापासून देण्यात येणार असल्याचे डॉ. नेर्लीकर यांनी सांगितले. या पुरस्काराच्या निवडीसाठी नऊ सदस्यांची स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे. त्यात अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव हे सावानाचे तीन कायमस्वरूपी सदस्य तसेच नेर्लीकर कुटुंबाचे दोन सदस्य, स्थानिक आमदार किंवा खासदार तसेच राष्टÑीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील पत्रकार यांचा समावेश राहणार आहे. ही समितीच अंतिम नावनिश्चिती करणार असल्याचेही नेर्लीकर यांनी नमूद केले. यावेळी आर्चिस नेर्लीकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, सहायक सचिव अभिजित बगदे, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी, भानुदास शौचे, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, शंकर बर्वे, वेदश्री थिगळे, किशोर पाठक आदी पदाधिकारी उपस्थित होते.११ लाख रुपयांची देणगीडॉ. नेर्लीकर दाम्पत्याने २००२ सालीच १४ लाख रुपयांची देणगी सावाना संस्थेकडे सुपूर्द केल्यानंतर २००३ सालापासून कार्यक्षम आमदार पुरस्कारास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, आता या पुरस्काराला राष्टÑीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने डॉ. नेर्लीकर यांनी त्या रकमेत अजून ११ लाख रुपयांची भर घालत एकूण मिळून २५ लाख रुपयांचा निधी सावानाकडे सुपूर्द केला आहे. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडूनदेखील संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. ही रक्कम लवकरच प्रदान केली जाणार असल्याची घोषणा जातेगावकर यांनी केली.लिमये सभागृहात देवघेव विभागनवीन देणगीच्या रकमेचा विनियोग पुरस्कार सोहळ्यासह लिमये सभागृहाच्या नूतनीकरणासाठी करण्यात येणार आहे. या दालनाचे नूतनीकरण झाल्यानंतर तिथेच पुस्तक देवघेव विभाग करण्यात येणार आहे. या दालनात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचीही सोय व्हावी म्हणून तिथे जाण्यासाठी लिफ्टची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तसेच नवीन रचनेत वाचकांना रॅकमधील कोणत्याही पुस्तकापर्यंत जाण्याची मुभा राहणार आहे.ई-वाचनालयाची सुविधानूतनीकृत दालनात ई वाचनालयाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, त्यासाठी दालनात तीन संगणकांचीदेखील उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच बालविभागातही दोन संगणक ठेवून तिथेदेखील ई वाचनालयाची सुविधा बालदोस्तांना करून देण्यात येणार असल्याचे सहायक सचिव अॅड. अभिजित बगदे यांनी सांगितले.
कार्यक्षम नव्हे, आदर्श आमदार, खासदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:28 AM