सिडको : येथील उपेंद्रनगर भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चव्हाण खूनप्रकरणी संशियतांचा तपास करून पोलिसांनी सिन्नर येथून वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या चौघा संशियतांना ताब्यात घेतले होते. मात्र हे चौघेही संशयित खुनाच्या नव्हे तर एका अपहरणाच्या गुन्ह्यात असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपेंद्रनगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री सराईत गुन्हेगार अजिंक्य चव्हाण याची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. या हत्त्येत सहभागी असल्याचा संशयावरून पोलिसांनी अमोल जाधव, गोरख वराडे, रवींद्र रनमाळे, (तिघे रा. सिन्नर), प्रदीप जायभाये (रा. आडगाव) या चौघांना ताब्यात घेतले होते. मोक्काच्या गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्याचे अपहरण करून त्यास कोर्टात प्रतिज्ञापत्र देण्यास या चौघांनी भाग पाडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मोक्काच्या गुन्ह्यात फिर्यादी झालेल्या एकास या चौघांनी न्यायालयात नेऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र संबंधित फिर्यादीने कोर्टातून पळ काढला होता. त्यानंतर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या अपहरणाच्या गुन्ह्यात या वाळू व्यावसायिकांचा संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर हे चौघेही टिप्पर गँगशी संबंधित असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.या चौघांवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या चौघांना सोमवारी (दि़२०) न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (वार्ताहर)
खुनातील नव्हे, तर अपहरणातील संशयित
By admin | Published: June 20, 2016 11:31 PM