खरेतर वाघमारे यांना ज्या काळजीतून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती, ती काळजी त्यांच्या राजीनाम्यामुळे तरी कमी झाली का? असाही प्रश्न उरतोच. मग या साऱ्या घटना, घडमोडी अचानक झाल्या की अंतर्गत काहीतरी धुमसत होते असे म्हणण्याला जागा उरते. राज्यात सध्या ओढावलेली आपत्तीची परिस्थिती पाहता जिल्ह्याने सतर्क राहिले पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. त्यातच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी तर अग्रक्रमावर आहे. नाशिक जिल्ह्याने आपत्तीचे सुयोग्य असे ‘डिझास्टर मॅनेजेमेंट’ देखील करून ठेवले आहे. ही समाधानाची बाब असली तरी ऐन पावसाळ्यात दोन्ही अधिकाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेणे आपत्ती ओढावण्यासारखे नाही का? ही वेळ टाळता यावी हे देखील एक आपत्ती निवारणच ठरले असते. कारण या काळात जिल्हा असा वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. या साऱ्या घडामोडी केवळ एका घटनेने घडून आल्या असे आतून तरी दिसत नाही.
वाघमारे यांनी राजीनामा पत्रात मानसिक ताणाचा केलेला उल्लेख सहजासहजी दुर्लक्षित करता येणारा नाही. जर त्यांनी कर्तव्यात कसूर केली असेल, तर त्यांना जाब हा विचारला जाणारच. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तेच केले. परंतु, या साऱ्या प्रकरणात सर्वकाही घाईत झाले की याच वेळेची उभयतांकडून वाट पाहिली जात होती हे मात्र त्यांनाच ठावुक. जे काही घडून आले त्यासाठी हीच वेळ होती का, असा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
- संदीप भालेराव (वार्तापत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून)
(टीप: सदर वार्तापत्र सलग लावावे. मध्येच इन्फो काढू नये.)