सारांशनाशिक महानगर व जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. आता तर रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळणे मुश्कील झाले आहे. पैसे भरायची तयारी असूनही व ओळखीपाळखीतल्या प्रतिष्ठितांचा वशिला लावूनही रुग्णालयात भरती व्हायला मिळत नाही म्हणून अनेकांचे प्राण कंठाशी येऊन ठेपले आहेत. ही वेळ एकजुटीने व पूर्ण ताकदीने संकटाशी मुकाबला करण्याची व ते संकट परतवून लावण्याची आहे; परंतु अशास्थितीत काही जण असेही आढळून येतात, की जे यंत्रणांतील उणिवांचा शोध घेऊन आपले राजकारण रेटू पाहतात, तर काही जण संधी साधून आपले उखळ पांढरे करू पाहण्याच्या धडपडीत दिसतात; हे दुर्दैवी, शोचनीय व म्हणूनच धिक्कारार्ह म्हणायला हवे.तिकडे लसींच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्रात कलगीतुरा सुरू झाल्याचे पाहता इकडे महापालिकेच्या रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत म्हणून एका लोकप्रतिनिधी असलेल्या भगिनीने उपोषणाचे हत्यार उपसलेले बघावयास मिळाले. ही आता आंदोलनाची वेळ आहे का? अनेक वर्षांपासून याच भागाचे प्रतिनिधित्व करत असताना कधी या बाबींकडे लक्ष दिले नाही; पण आता महापालिकेत दुसऱ्यांची सत्ता आहे म्हणून आंदोलनबाजी केली गेली. सर्वत्र भय दाटले असताना व फिजिकल डिस्टन्सिंगचे आवाहन केले जात असताना एका पक्षाने मेळावे भरविणे चालविले आहे. सातपूरमध्ये एका राजकीय पक्षाने थेट फलक लावून आवाहन केले की, कोरोनाबाबत कोणाच्या काही अडचणी असल्यास संपर्क करा. हरकत नाही, लोकांना मदतीचा आश्वासक हात यातून मिळेल; पण व्हेंटिलेटर मागितले गेले तर ते पुरविले जाणार आहे का? महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी वार्डावार्डात काहींनी स्वत:ची छबी झळकावून घेतल्याचेही पाहावयास मिळत आहे नाशिक महापालिकेची निवडणूक आणखी आठ-दहा महिन्यांवर येऊन ठेपली म्हटल्यावर लोकांशी जवळीक साधावी लागेल हे खरे; पण त्यासाठी आपत्तीचेही राजकारण करण्याची खरेच गरज आहे का, हा यातील प्रश्न आहे.संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीतच करण्याचे शासनाचे आदेश आहेत; पण कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नाशकातील विद्युतदाहिनी कमी पडत आहेत. यावर उपाय म्हणून नाशिकच्या पंचवटी, दसक आणि उंटवाडी या तीन स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; पण सोयीच्या ठेकेदाराला याचा ठेका मिळावा म्हणून वारंवार यासंबंधीच्या निविदांमध्ये बदल करून मुदतवाढ देण्यात येत आहे. एकीकडे अत्यावश्यक बाब म्हणून अनेक कामे तडकाफडकी करून घेतली जात असताना दुसरीकडे विद्युतदाहिनीसारख्या गरजेच्या उपकरणाबाबत वेळकाढूपणा होताना दिसणार असेल तर त्यातून संधिसाधूपणाचीच शंका घेता यावी.खरे तर कोरोनाची वाढ अगर संसर्ग रोखायचा असेल तर त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. प्रभागाप्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत देखरेख ठेवून बाधित रुग्ण घराबाहेर पडून ते कोरोना स्प्रेडर ठरणार नाही याची काळजी घेतली तर इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही. असे करायचे तर त्यातून नाराजी ओढवू शकते, तेव्हा मतदारांना दुखावण्यापेक्षा आंदोलन व निवेदनबाजीचा सोपा मार्ग पत्करला जाताना दिसतो. हे उचित वा समर्थनीय ठरू नये.पक्षभेद बाजूस ठेवून सहकार्य हवे....कुठे कुणाची सत्ता, याचा विचार घडीभर बाजूस ठेवायला हवा. हे संकट सर्वांवरचे आहे. समस्त मानवजातीवरचे आहे. वैद्यकीय, शासकीय व प्रशासकीय यंत्रणा मोठ्या शर्थीने त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, अगदी स्वत:चा जीव धोक्यात घालून ते लढत आहेत. अशावेळी पक्षभेद बाजूस ठेवून सहकार्याच्या भूमिकेतून सर्वांनी वागणे अपेक्षित आहे. या संकटातून बाहेर पडल्यावर हवे तितके राजकारण करा; पण आता ती वेळ नाही हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे.
"ही" राजकारणाची अगर संधिसाधूपणाची वेळ नाही!
By किरण अग्रवाल | Published: April 10, 2021 9:01 PM
आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते.
ठळक मुद्देआंदोलन करण्यापेक्षा प्रभागातील कोरोना स्प्रेडरवर लक्ष ठेवायला हवेपक्षभेद बाजूस ठेवून सहकार्य हवे....रुग्णांना ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळणे मुश्कीलकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीतच करण्याचे शासनाचे आदेश