पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली असून, शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. ७ जून) कुंभाळेपैकी बोरीचीबारी येथे जयश्री डेव्हिड भोये (३७) ही महिला पोहऱ्याने पाणी खेचत असताना पाय घसरून विहिरीत पडली. सुदैवाने त्याच महिलेच्या मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत करून महिलेला दोरांच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला असला तरी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याची तातडीने दखल घेत या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. (०८ बोरीचीबारी)