नाशिकरोड : येथील नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय सुरू करण्यात आले असून, भारत प्रतिभूती मुद्रणालय येत्या सोमवारपासून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.मुद्रणालय मजदूर संघाची व मुद्रणालय व्यवस्थापन यांची नुकतीच बैठक पार पडून मुद्रणालय सुरू करण्याबाबत विचार-विमर्श करण्यात आला; त्यानुसार चलार्थपत्र मुद्रणालयात नोटा छपाई संदर्भातील कामे सुरू करण्यात आली आहेत, तर भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवार १८ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.भारत प्रतिभूती मुद्रणालयमध्ये एन.जे.एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे. परफोरेशन व एक्झामिनेशनचे काम तसेच बार्इंड्रिंगमध्ये कटिंग आणि हॅन्ड नंबरिंग, सी.एस.डी., स्टोअर तसेच एक्साइज सीलचे प्रिंटिंग कामदेखील प्रथम सुरू होतील.कँटीनमधून संसर्गाचा धोका असल्यामुळे कँटीन बंद राहील. गरजेनुसार वेगवेगळे विभाग टप्प्या टप्प्याने सुरू केले जाणार आहेत. कामगारांचे मेडिकल बिल थकले आहेत. त्यांच्यासाठी संबंधित क्लर्कला बोलावून कामे सुरू करण्यात यावे ही सूचनादेखील व्यवस्थापनाला करण्यात आली.
सोमवारपासून नोटप्रेस सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:03 AM