सारांश‘ंसमय से पहले और नसीब से जादा किसी को कुछ मिलता नही’, या भागवतवचनावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अतूट श्रद्धा असावी म्हणून की काय, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी अन्य सारेच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले असताना या पक्षात मात्र शहरातल्या नेतृत्व बदलाचीच मागणी प्राधान्याची ठरलेली दिसत आहे. देशात प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या राजकीय एकाधिकारशाहीविरुद्ध समर्थ व सक्षमपणे लढण्यासाठी पक्षाध्यक्षांपासून अन्य सारेच वरिष्ठ नेते जिवापाड मेहनत घेऊन लोकांपर्यंत पोहोचत आहेत; पण नाशकात त्यापेक्षा शहराध्यक्ष हटाववरच भर दिला जाताना दिसून यावा, यातून कर्मापेक्षा नशिबावरच संबंधितांचे विसंबून राहणे स्पष्ट व्हावे.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी प्रत्यक्ष रणांगणात समोरा-समोर येण्यापूर्वी पक्ष पातळीवरील कार्यकर्त्यांचे संघटन व त्यांची मानसिक मशागत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सत्ताधारी भाजपा आघाडीवर असून, ‘वन बूथ टेन यूथ’च्या घोषणेत काळानुरूप बदल करीत एका बूथसाठी २५ युवक तयार ठेवण्याची रणनीती आखली जात आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी नाशकात सुस्तावलेल्यांची झाडाझडती घेत सर्वांना सक्रियतेच्या सूचना केल्या आहेत. ‘मनसे’त मागे नेतृत्व बदल केला गेल्यानंतर व राज ठाकरे यांच्या ग्रामीण भागातील दौºयांना लाभलेल्या प्रतिसादानंतर बºयापैकी हायसे वातावरण आकारास आलेले दिसत आहे, तर आघाडी अंतर्गतच्या राष्ट्रवादीतही संभाव्य इच्छुक कामाला लागले असून, जिल्हा कार्यकारिणी घोषित करून ठिकठिकाणची पक्षबांधणी हाती घेण्यात आली आहे.काँग्रेसमध्येही एक खूप चांगला खांदेपालट झाला, तब्बल तीन पंचवार्षिकपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्षपदी मांडी घालून बसलेल्या राजाराम पानगव्हाणे यांची उचलबांगडी करून डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपविले गेले. या नेतृत्व बदलामुळे जिल्ह्यात साचलेली काँग्रेस प्रवाही होण्यास नक्कीच मदत घडून येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात पक्षाचे दोन आमदार असून, दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे आठ गटही या पक्षाकडे असून, अनेक सहकारी संस्थांत नाही म्हटले तरी काँग्रेस नेते-कार्यकर्ते अस्तित्व टिकवून आहेत. परिणामी या पक्षाला जिल्ह्यात पुन्हा सक्षमतेने उभे राहण्यात फारसी अडचण येऊ नये; परंतु नाशिक शहरात काय?नाशकात काँग्रेसची पुरती वाताहात झाल्यासारखी स्थिती आहे. प्रदेशवर काम केल्याचा अनुभव म्हणून वेळकाढू धोरणांतर्गत शरद आहेर यांना हंगामी शहराध्यक्षपदी नेमले गेले होते; परंतु अनेक हंगाम निघून गेले तरी बदलाचे नाव घेतले जाताना दिसत नाही. बरे, त्यांचे काम किंवा संघटन कौशल्य पक्षासाठी लाभदायी ठरताना दिसले असते तर हरकत नव्हती; पण त्यांनी काँग्रेस कमिटीत पाऊल ठेवल्यापासून अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठांनी तेथून काढता पाय घेतल्याचे लपून राहिलेले नाही. ‘माजी’ प्रवर्गात मोडणारे किमान डझनभर आमदार, खासदारादी राहिलेले मान्यवर नाशकात आहेत. त्यांच्या अनुभवाचा, संपर्काचा लाभ घेणे नाही, की कसला नवा कार्यक्रम-उपक्रम; त्यामुळे पक्षच मोडकळीस आल्यासारखी स्थिती आहे.पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व प्रभारी वालसी चांदरेड्डी आदींनी वेळोवेळी नाशकात येऊन कार्यक्रम घेतले, पक्ष-बैठका घेतल्या; त्यामुळे खूप आशादायी वातावरणही निर्माण झाले. परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी लागते ती सक्रियता स्थानिकांकडून दाखविली जाताना दिसत नाही. नाशकात वरिष्ठ पातळीवरील नेते आले तरच स्थानिक पातळीवरील सारे एकत्र येतात, पण नेत्यांची पाठ फिरली की कुणी काँग्रेस कमिटीकडे फिरकत नाही. याच साºया पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदाप्रमाणे शहराध्यक्ष बदलण्याची मागणी जोर धरून आहे. प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी अनेकांशी केलेल्या बंददाराआडच्या चर्चेतही तीच मागणी केली गेली. त्यामुळे आता त्यांच्या अहवालानंतर पुढे काय व्हायचे ते होईलही; परंतु या साºया सुप्त संघर्षाच्या, नाराजीच्या व बेकीच्या परिस्थितीत वेळ निघून जातेय त्याची खंत सामान्य कार्यकर्त्यांना लागून राहणे स्वाभाविक आहे.
नाशिक शहर कॉँग्रेसमधील धुम्मस काही संपेचना...
By किरण अग्रवाल | Published: February 10, 2019 2:06 AM
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रियतेने लोकांसमोर जाणे खोळंबलेले दिसत आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील एका जागेवर हक्क सांगणाºया पक्षातील नेतृत्वासंबंधीचा संघर्ष अस्वस्थ करणाराकाँग्रेसमध्येही एक खूप चांगला खांदेपालट झालाखूप आशादायी वातावरणही निर्माण झाले. परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी लागते ती सक्रियता स्थानिकांकडून दाखविली जाताना दिसत नाही.