नाशिक : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवापेटवीचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या विषयांवर समाजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या शरद पवार यांनी तोडगा काढावा, यासाठीच त्यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण विषयाचे कळत नाही, असे कोणतेही विधान केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भुजबळ फार्महाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार यांच्या भेटीमागे समाजकारण हाच विषय होता. आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे. त्यात लक्ष घालावे, अशी विनंती पवारांना केल्याचे भुजबळ म्हणाले.
कोणाला बोलवायचे, हे पवारच ठरवतील
आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात कोणाला बैठकीला बोलावयला हवे, अशी विचारणा शरद पवार यांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, उद्धव ठाकरे, नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची चर्चा झाली. मात्र, जास्त व्यक्ती असतील तर प्रश्न लवकर सुटत नाहीत, असे पवार यांचेच म्हणणे होते. त्यामुळे कोणाला बोलवायचे हे शरद पवार ठरवतील, असेही भुजबळ म्हणाले.
‘म्हणूनच १८-१८ तास मुख्यमंत्री काम करतात’
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांना सर्व काही कळते म्हणूनच ते १८-१८ तास काम करीत असतात. त्यांना काही कळत नाही, असली वक्तव्ये मी तर सहन करणार नाही, असा टोला अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. ते मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.