दरम्यान, अशाच प्रकारे चार रुग्णालयांत महापालिकेच्या आरक्षित खाटांवर एकही रुग्ण दाखल न झाल्याने म्हणजेच शून्य रुग्ण दाखल असल्याचे दाखविल्याने त्यांनादेखील नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य लेखापाल बी.जी. सोनकांबळे यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयावह होती. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झालेली ही लाट मे महिन्यात कमी झाली असली, तरी मार्च आणि एप्रिल महिन्यांत शिगेला पोहोचली होती. त्या काळात सहा ते सात हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. त्यातच नाशिक शहरात ग्रामीण भागातूनच नव्हे तर, उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण दाखल होत होते. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्येही ताण वाढला होता. रुग्णालयांत एक खाट मिळणे बिकट झाले होेते. सामान्य नागरिकांना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी महापालिकेला हेल्पलाइन सुरू करावी लागली होती. तरीही, बेड मिळणे दुरापास्त होते. अशावेळी सर्व रुग्णालये फुल्ल असताना प्रत्यक्षात मात्र अनेक रुग्णालयांनी त्यांच्याकडे नाशिक महापालिकेच्या असलेल्या ८० टक्के खाटांवर रुग्ण कमी दाखल झाले किंवा दाखलच झाले नाहीत, अशी धक्कादायक माहिती महापालिकेच्या दफ्तरी उपलब्ध झाली आहे.
नाशिक महापालिकेने ८० टक्के खाटा आरक्षित केल्यानंतर त्यात महिनाभरात अनेक खाटा रिक्त होत्या आणि त्यामुळे महापालिकेला संबंधितांनी बिलेच सादर केल्याची बाब महापालिकेच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यात जेथे एकही बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते, अशावेळी या रुग्णालयात रुग्णसंख्या कमी कशी काय होती, याचा खुलासा संबंधितांकडून मागविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखापरीक्षक बी.जी. सोनकांबळे यांनी दिली.
कोट...
महापालिकेने १६७ कोविड रुग्णालयांना मान्यता दिली होती. आता त्यांचे ऑडिट करताना अनेक रुग्णालयांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात महापालिकेने आरक्षित केलेल्या ८० टक्के खाटांवरील रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसत आहे. कारण, त्यांचे बिलच सादर झालेले नाही. अशाच प्रकारे चार रुग्णालयांनी तर महापालिकेच्या आरक्षित बेडवर एकही रुग्ण नसल्याचे दाखवल्याने त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागवण्यात येेणार आहे.
- बी.जी. सोनकांबळे, मुख्य लेखापरीक्षक, महापालिका