नाशिक- कोरोनाशी दोन हात करताना महापालिकेतील वैद्यकीय विभागाचे मनुष्यबळ कमी असल्याने मानधनावर १३२१ पदांवर उमेदवार नियुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र, त्यातील ६०० उमेदवार रुजूच झालेले नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना साथरोग प्रतिबंधात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटिसा बाजवण्यात आल्या आहेत. महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी गेल्या काही वर्षांपासून पडून आहे. त्यात वैद्यकीय विभागाचादेखील समावेश आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आले, परंतु त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ महापालिकेकडे नाही. त्यामुळे महापालिका शासनाच्या आदेशानुसार तीन तीन महिन्यासाठी पदे भरत आहेत. परंतु त्यानंतर भरतीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
महापालिकेने आतापर्यंत मानधनावर १ हजार ३२१ पदे भरण्यात आली. यामध्ये १६ विविध पदनामाच्या १३२१ पदांना जाहिरातीच्या माध्यमातून रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आले . यापैकी दि. ११ एप्रिल २१ पर्यंत ७२१ अधिकारी-कर्मचारी महानगरपालिकेमध्ये रुजू झाले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले. मनपाने काढलेल्या जाहिरातीत फिजिशियन, एमबीबीएस, बीएएमएस, स्टाफ नर्स, एएनएम, एमडी मायक्रोबायोलॉजी, एमएस्सी मायक्रोबायोलॉजी, सिटी स्कॅन तंत्रज्ञ, एमआरआय तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, समुपदेशक, वाॅर्ड बॉय,फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टीस्किल हेल्थ वर्कर या पदनामच्या १३२१ उमेदवारांना रुजू होण्यासाठी आदेशित करण्यात आले होते. त्यापैकी ६०० उमेदवार कोणतेही कारण न सांगता रुजू झालेले नाहीत.
निवड होऊनही रुजू न झालेल्या ६०० कर्मचाऱ्यांना आयुक्त कैलास जाधव यांच्या आदेशानुसार ११ एप्रिल रोजी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही संबंधित उमेदवार रुजू न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. आष्टीकर यांनी दिली.
इन्फो...
मानधनात वाढ
कोरोना काळात जोखमीचे काम असतानही अपुरे मानधन असल्याच्या तक्रारी असल्याने महापालिकेने आता संबंधितांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. फिजिशियन दीड लाखवरून अडीच लाख रुपये प्रति महिना असे मानधन वाढविण्यात आले आहे. तसेच मल्टीस्किल हेल्थ वर्कर - सात हजार रुपयावरून १२ हजार रुपये, आया व वॉर्ड बॉय - सहा हजार रुपयेवरून १२ हजार रुपये, तसेच एमबीबीएस - रुपये ७५ हजारवरून रुपये एक लाख रुपये, बीएएमएससाठी ४० हजारवरून रुपये ६० हजार रुपये, स्टाफ नर्सेसला रुपये १७ हजार रुपयावरून २० हजार प्रति महिना व एएनएमसाठी १५ हजार रुपयावरून १७ हजार रुपये प्रति महिना अशी मानधनात वाढ केलेली आहे.