नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत असून, खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही ज्या रुग्णालयांनी प्रकल्प उभारणीसाठी कार्यादेश दिलेले नाहीत त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना १५ ऑगस्टपासून रुजू करून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
आयुक्त कैलास जाधव यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात हे आदेश दिले आहेत. नाशिक महापालिकेने कोराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी वेगाने तयारी केली असून, सुमारे सतराशे ऑक्सिजन बेड्स महापालिका रुग्णालय तसेच कोविड सेंटर्समध्ये असणार आहेत. याशिवाय खासगी रुग्णालये आणि विशेषत: पन्नासपेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांनी असे प्रकल्प उभारले नसतील त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेची विविध रुग्णालये, कोविड सेंटर्समध्ये पीएसए ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येत आहेत. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळेत काम करून घ्यावे; अन्यथा मुदतीत काम न केल्याने नोटिसा बजावण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्या आठवड्यात महापालिकेने पुरेसे मनुष्यबळ वैद्यकीय विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी भरती मोहीम राबविण्यात आली होती. राज्यभरातील इच्छुक उमेदवार भरतीसाठी नाशिक महापालिकेत आले होते. यातील पात्र उमेदवारांना १५ ऑगस्टपासून रुजू करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
..इन्फो..
सावतानगर येथील कोविड सेंटर बंद करणार
काेरोनाबाधितांची संख्या घटल्याने सिडकोतील सावतानगर येथील कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तेथे सध्या नगण्य रुग्ण असून, त्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. अर्थात, या ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उभारण्यात येणार आहेत.
इन्फो..
भोजनासाठी केंद्रनिहाय निविदा
महापालिकेची कोरोना रुग्णालये तसेच कोविड सेंटर्समध्ये भोजन पुरविण्यासाठी निविदा मागवण्यात येणार असून, गेल्या वेळी झालेले वाद बघता यंदा कोविड रुग्णालये आणि सेंटर्सनिहाय भोजन ठेके देण्यात येणार आहेत.